मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केले आहे. यानंतर राज्यातील काँग्रेस (Congress) नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावरून संजय गायकवाड यांच्यासह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नाना पटोले यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडला वेळीच आवरा. ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही, त्यानं राहुल गांधींवर बोलूच नये. अंथरूण बघून पाय पसरावे म्हणतात ना, तसं गायकवाडनं आधी आपली पातळी पाहावी. प्रसिद्धीसाठी बरळणाऱ्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या सरकारची गुंडशाही, हुकूमशाही, तालिबानशाही जनता पाहत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.
राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही?
नाना पटोले यांनी पुढे म्हटलंय की, पहिले भाजपचा एक नेता पक्षाचा झेंडा हाती घेऊन देशाच्या विरोधीपक्ष नेत्याला जीवे मारण्याची धमकी देतो. दुसरे भाजपचा नेता आणि मंत्री राहुल गांधींचा उल्लेख दहशतवादी म्हणून करतात. यावर नरेंद्र मोदी आणि अमित शाह मूग गिळून गप्प बसतात आणि आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातला गुंड प्रवृत्तीचा आमदार देशाच्या विरोधी पक्षनेत्याची जीभ कापून टाकण्याची भाषा करतो. यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडलीच पाहिजे. या राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? लोकशाही मानता की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पंजा काय करेल हे कळणारही नाही
संजय गायकवाड, तोंडाला आवर घाला नाहीतर पंजा काय करेल हे कळणारही नाही. आधी तुमची लायकी आहे का संविधान आणि राहुल गांधींवर बोलायची? हे एकदा पाहा. सत्तेच्या माजात काहीही बरळू नका. नाहीतर निवडणुकीत घरचा रस्ता पक्का समजा. जनता यांना धडा शिकवणारच. मतदार घरचा रस्ता दाखवणारच, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला.
आणखी वाचा
राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली