मुंबई: हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar)  यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली आहे. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 


नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. 


नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे. 


हिंगोलीत ठाकरे गटाची बाजी


मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघ सुरूवातीपासूनच चर्चेत राहिला होता. या ठिकाणी तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला आणि एकनाथ शिंदे यांना उमेदवार बदलावा लागला. शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी बाबुरावर कोहळीकर यांना तिकीट दिलं. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर यांना तिकीट मिळालं. 


हिंगोलीत महायुतीमध्ये वाढलेल्या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा महायुतीला झाला. तसेच मराठा आरक्षणाचा मोठा परिणाम या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीवर दिसून आला. परिणामी ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. 


लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोलीमध्ये ठाकरे गट राजकारणात वरचढ झाल्याचं दिसून आलं. त्याच पार्श्वभूमीवर आता नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि मंत्री अब्दुल सत्तारांची घेतलेली भेट मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. या गुप्त भेटीचा कोणत्या गटाचा फायदा होतो आणि कोणत्या गटाला फटका बसतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.


ही बातमी वाचा: