छत्रपती संभाजीनगर: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत अंबादास दानवे शिंदे गटात (Shinde Camp) जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. या सगळ्यानंतर मातोश्रीवरुन अंबादास दानवे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचीही चर्चा आहे. मात्र, अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. मी एका निवडणुकीसाठी पक्षासोबत गद्दारी करणार नाही, असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले. ते शनिवारी सकाळी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.


यावेळी अंबादास दानवे यांना तुम्ही शिंदे गटात जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दानवे यांनी म्हटले की, ज्या नेत्याबद्दल चर्चा सुरु आहे, तो मी नव्हेच! मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मी सत्ता आणि खुर्चीसाठी हपापलेला नाही. उद्या मला पक्षाने सगळं सोडायला सांगितलं तर मी तयार आहे. मी निवडणुकीसाठी गद्दारी करणार नाही, असे अंबादास दानवे यांनी ठामपणे सांगितले. तुम्ही शिंदे गटात जाणार या चर्चेविषयी तुमच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय, असा प्रश्नही दानवे यांना विचारण्यात आला. त्यावर दानवे यांनी म्हटले की, माझी आई आमच्या कुटुंबाची प्रमुख आहे. आमच्यापेक्षा जास्त संवेदनशील ती आहे. तिने मला अगोदरच सांगितले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाशी बेईमानी करता कामा नये. माझ्या आईचं उद्धव ठाकरेंवर प्रेम आहे. त्यामुळे मी त्यांची साथ सोडून शिंदे गटात गेलो तर तुझा आणि आमचा संबंध संपला, अशी सक्त ताकीद आईने मला दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.


अंबादास दानवेंच्या नाराजीची चर्चा का रंगली?


छत्रपती संभाजीनगरमध्ये कायमच अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात पक्षांतर्गत स्पर्धा दिसून आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून लढण्यासाठी अंबादास दानवे इच्छूक आहेत. परंतु, ठाकरे गटाकडून माजी खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चेला आणखीनच हवा मिळाली. महाविकास आघाडीतील एक बडा नेता एक- दोन दिवसांत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याचे शिरसाट यांनी म्हटले होते.



चंद्रकांत खैरेंनी मला सतत डावलले; दानवेंची नाराजी


अंबादास दानवे यांनी त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चेने जोर धरल्यानंतर पत्रकारपरिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्याविषयीची नाराजी उघडपणे बोलून दाखवली. चंद्रकांत खैरे नेहमी मला डावलण्याचा प्रयत्न करतात. दोन दिवसांपूर्वी प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजनाची देखील मला कोणतेही माहिती देण्यात आली नव्हती. तर, लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळो न मिळो, मला मिळावी माझी मागणी आहे. मी पक्षाचा बांधील शिवसैनिक आहे. पक्षाच्या विषयी संभ्रम निर्माण होऊ शकत नाही. इतर कोणताही उमेदवार दिला तर नुकसान होऊ शकतो, खैरे यांना उमेदवारी दिली तरी नुकसान होऊ शकतो. आता माझ्यामुळे खैरे पडले असे त्यांनी बोलून दाखवू नयेत, असे अंबादास दानवे यांनी म्हटले होते.


आणखी वाचा


मोठी बातमी! अंबादास दानवे नाराज, शिंदे गटात जाणार?; थेट मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न