Jalgaon Train Accident जळगाव: लखनऊवरून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधील  (Pushpak Express Accident) एका डब्ब्यात आग लागल्याच्या भीतीने त्यातील प्रवासी रेल्वे रुळांवर थांबलेले असतानाच वेगात आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली सापडून 13 प्रवासी चिरडून ठार झाले. ही धक्कादायक घटना बुधवारी (22 जानेवारी) दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास परधाडे रेल्वेस्थानकाजवळ घडली. तर 25 प्रवासी जखमी झाले आहे. जखमींवर पाचोरा आणि जळगावमधील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Jalgaon Train Accident Marathi News)


जळगाव जिल्हा रुग्णालयात सध्या मृताकांच्या नातेवाईक जमण्यास सुरुवात झाली आहे. मृतकात चार जण नेपाळचे असल्याचं निष्पन्न झालं असून त्यांचे नातेवाईक पुणे आणि मुंबई येथून जळगाव येथे पोहचले आहेत. नेपाळच्या एका 11 वर्षीय बालकाचा यात समावेश असून एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन सर्व मृतदेह त्यांच्या मूळ गावी पोहचविण्याची तयारी करत आहे. यावेळी जळगाव जिल्हा रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.


नेपाळच्या कमला भंडारी या महिलेचा मृत्यू-


जळगाव रेल्वे अपघातामध्ये कमला भंडारी या नेपाळच्या महिलेचा यात मृत्यू झाला. यावेळी कमला भंडारी यांच्यासोबत त्यांच्या सून होत्या. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर सासू कमला भंडारी यांना सावरताना चोरट्यांनी त्यांचा मोबाइल, पर्स व त्यातील पैसे चोरून नेले. याशिवाय अनेक प्रवाशांचे पैसे व बॅगा लांबविण्यात आल्याचे सांगण्यात आल्याची माहिती समोर आली. 


प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं? 


बाबा जाधव हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांनी सांगितलं की, परधाडे स्टेशनच्या आधी ट्रेनचा ब्रेक लागल्याने घर्षण झालं आणि आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यावेळी प्रवाशांनी उड्या मारायला सुरूवात केली. त्यामध्ये अनेकजण कर्नाटक एक्स्प्रेसच्या खाली आले.


अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य-


जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल.जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.




संबंधित बातमी:


Jalgaon Train Accident: ट्रेनमधील चहा विक्रेत्याचं एक वाक्य अन् होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक माहिती