Corporation Election: निवडणुका महाराष्ट्रात कधी होणार या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. आता याच संदर्भातली मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातल्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात राज्य निवडणूक आयोगाकडून अर्ज सादर करण्यात आला आहे. या अर्जात महापालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये घेण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या, अशी विनंती करण्यात आली आहे. लवकरच या अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात निवडणुका नोटिफाय करा, असे आदेश दिले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात आपला हा अर्ज सादर केला आहे. निवडणूक आयोगाच्या अर्जानुसार, जून महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वॉर्ड रचना आणि इतर प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करू, असं आयोगाने कोर्टात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे. पण त्यानंतर पुढची प्रक्रिया ऐन पावसाळ्यात पूर्ण करावी लागेल. त्यात काय काय प्रशासकीय अडचणी आहेत, हे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. पावसाळ्यात मतदान झाल्यास मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकते, अशी भीती देखील या अर्जात निवडणूक आयोगाकडून व्यक्त केली गेली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आपल्या या अर्जात विनंती केली आहे की, सप्टेंबर महिन्यात शहरी भागातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, ज्यात महानगरपालिका आणि नगरपंचायत या निवडणुका घेण्याच्या परवानगी आम्हाला द्याव्यात. तसेच ऑक्टोबर महिन्यात ग्रामीण भागातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या परवानगी देण्याची विनंती केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोग लवकरच निवडणूक आयोगाच्या अर्जावर सुनावणी करू शकते.
संबंधित बातम्या:
ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा! राज्यातील 25 झेडपींचा गट, गण रचनेचा कार्यक्रम जाहीर