Balasaheb Thackeray Memorial : शिंदे गटातील नवनियुक्त मंत्री आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केल. मंत्रिपद मिळाल्यानंतर शिंदे गटातील सर्व नऊ मंत्री एकत्रितपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरच्या शिवाजी पार्क इथल्या स्मृतिस्थळी (Memorial) येऊन दर्शन घेतलं. यावेळी शिवाजी पार्क परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इथे बॅरिकेडिंग देखील करण्यात आली आहे. या नवनियुक्त मंत्र्यांचं अभिनंदन करणारे आणि स्वागताचे पोस्टर्स शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आले आहेत.
याआधी सुद्धा शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी (Floor Test) झाल्यानंतर तसंच गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्यासह शिं गटातील आमदारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं होतं.
गुरुपौर्णिमेला मुख्यमंत्र्यांचं बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन
गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत वंदन केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, शिवसैनिक या राज्याचा मुख्यमंत्री झाला, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. "बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छांमुळेच सर्व घडामोडी शक्य झाल्या आहेत. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासोबतचे 50 आमदार करत आहोत. बाळासाहेबांनी नेहमीच सर्वसामान्यांना काम देण्याचं काम केलं आहे. मराठी माणसांना आणि हिंदूंना ताठ मानेनं जगण्याची शिकवण बाळासाहेबांनी दिली. म्हणून त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही काम करतोय."
बाळासाहेबाचं हिंदुत्त्व पुढे घेऊन जाणार : बंडखोर आमदार
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी बंडखोरी केली. महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेनेला हिंदुत्त्वाचा विसर पडला. त्यामुळे केवळ बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी वेगळी वाट निवडल्याचं बंडखोर आमदारांनी सांगितलं. बंडाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदारांच्या तोंडी सातत्याने 'बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्त्व' किंवा 'बाळासाहेब ठाकरे' हे शब्द वारंवार येत आहेत
अखेर मंत्रिमंडळ विस्तार पार पडला
40 दिवसांपासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी (9 ऑगस्ट) पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.
शिंदे गटातील नऊ मंत्री
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संजय राठोड
संदीपान भुमरे
उदय सामंत
तानाजी सावंत
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई