(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांची फटकेबाजी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज जाहीर सभेत जोरदार फटकेबाजी केली.
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील युवकांशी संवाद साधला. यावेळी साताराच्या विकासाच्या दृष्टीने युवकांनी मला साथ द्यावी मी कायम विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये डायलॉगबाजी केली. या डायलॉगबाजीमुळे युवकांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
उदयनराजे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
आपण नेमकं काय करायचे हे ठरवायला आज आपण इथ जमलो आहे. मला माहित आहे, करुया, झालं पाहिजे, होईल.. काम करणारे दुसर्यावर अवलंबून राहत नसतात. सातारा एवढा हॅपनिंग करून टाकतो की पुण्या-मुंबईचे लोक साताऱ्यात आले पाहिजेत. फक्त तुमची साथ पाहिजे. उदयनराजे म्हणजे तोंडाच्या वाफा नाहीत, बोला तो बोला.
सातारा जिल्ह्याचे वैशिष्ट्य माहित आहे का? कोणालाही विचारा कसा आहेस? विचारलं तर उत्तर येते निवांत. निवांत कधी असावं, ज्यावेळेस सातारा प्रगतशील होईल. संध्याकाळी मित्रांनी एकमेकांना फोन केला की सगळ्यांचे कोडवर्ड ठरलेले असतात. यादरम्यान उदयनराजेंनी कॉलर उडवत लिव्ह इट किंग स्टाइल अस ते म्हणाले.
मागील चार वर्षात सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून कामे करून दाखवली का नाही? असा सवाल करीत ग्रेड सेपरेटर बनवताना खोदून ठेवलेल्या कामाबाबत आमदार शिवेंद्रराजे यांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले खोदून ठेवल्याशिवाय कामे कशी होणार. कामाला उशीर का लागला यावर टीका होते. प्रत्येक गोष्टीला प्रपोजल तयार करावे लागते. पाठ पुरावा करावा लागतो आणि मग ही विकास कामे होत असतात यावर बोलताना राजे म्हणाले जन्माला येणाऱ्या बाळाला देखील नऊ महिने लागतात, मी काही देव नाही.
हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू हा लोकांनी खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे असे सांगून एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मै अपनी खुद की भी नही सुनता अशी उदयनराजेंनी डायलॉग बाजी केली.