सोलापूर : सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्याकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा ‘चंपा’ म्हणून उल्लेख करण्यात आल्याचं समोर आलं आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘चंपा’ म्हणून उल्लेख केला. बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात उशीर येण्याचे कारण सांगताना प्रणिती शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून नामोल्लेख केला. 


खासदार प्रणिती शिंदेंकडून चंद्रकांत पाटलांचा ‘चंपा’ म्हणून उल्लेख


सोलापूरमधील एका ठिकाणी कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्या. याचं कारण देताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागते. मला इथे यायला उशीर झाला. 10 वाजताची वेळ होती, पण मला यायला दोन वाजले. कारण मी इथंपर्यंत आले होते, पण आपले पालकमंत्री चंपा असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या वक्तव्यावरून भाजपकडून खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.


'सोलापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही'


प्रणिती शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' उल्लेख केल्याच्या वक्तव्यावर भाजपची सडकून टीका करण्यात येत आहे. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी म्हणाले, वडिलांच्या वयाच्या मंत्र्यांचा उल्लेख तुम्ही ज्या पद्धतीने करता त्याबद्दल तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. नेहमीच संस्काराची भाषा बोलणाऱ्या प्रणिती शिंदे तुम्हाला कशाची मस्ती आहे. तुम्ही अद्याप संसदेमध्ये खासदारकीची शपथ घेतलेली नाही आणि एकेरी भाषेत उल्लेख करता. प्रणिती शिंदे हे बोलताना तुम्हाला थोडी लाज वाटायला हवी होती. एवढी टवाळखोरी जर तुमच्या बोलण्यात असेल तर सोलापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. 


भाजपकडून प्रणिती शिदेंवर जोरदार टीका


चंद्रकांत पाटलांचा ‘चंपा’ म्हणून उल्लेख केल्यानंतर भाजप आमदाराने खासदार प्रणिती शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. खासदाराचं किती बालिशपणा आणि असभ्य वर्तन असल्याचं म्हणत भाजपचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आपण खासदार आहात मिमिक्री स्टार नाही, असं x मीडियावर पोस्ट करत कल्याण शेट्टी यांनी  प्रणिती शिंदेंवर साधला निशाणा आहे.


भाजप आमदाराचा एक्स पोस्टमधून निशाणा


सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी एक्स मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, किती बालिशपणा नि असभ्य वर्तन खासदाराचं! प्रणिती शिंदे आपण खासदार आहोत, हे पण विसरलेली दिसताय. जवळपास आपल्या वडिलांच्या वयाच्या नेत्याबद्दल असं तोंड  वेंगाडणं, त्यांचा नको तो उल्लेख करणं यावरून खासदारकीची हवा डोक्यात गेल्याचंच दिसतंय. आपण खासदार आहोत, मिमिक्री स्टार नाही, हे लक्षात घ्या!


भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची एक्स पोस्ट