नाशिक : राज्यात शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त (Shiv Sena Vardhapan Din) मुंबईत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात तर एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेचा कार्यक्रम वरळीमधील डोममध्ये झाला. या वर्धापन दिन सोहळ्यातून भाषण करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकऱ्यांना (Warkari) विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले. आता यावर वारकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 


शिंदे सरकारने आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Wari 2024) राज्यातील दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, सर्वत्र पैशाची मस्ती सुरू आहे. आता तर वारकऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी मते, क्रिकेटचे संघ आणि मंडळांना पैसे देऊन विकत घेतले. आता ते वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वारकरी हे या महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती आहेत. शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना चांदीच्या ताटात नजराना पाठवला होता. तो नजराना तुकोबारायांनी माघारी पाठवला होता, असे त्यांनी म्हटले. 


संजय राऊतांच्या वक्तव्यावर वारकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया


आज त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले होते. यावेळी वारकर्‍यांशी संवाद साधला असता त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. अनुदानावर वारकरी अवलंबून नाही. वारकरी लाचार नाही. सरकार अनुदान देत असेल तर ते त्यांच्या खिशातून देत नाही, तो जनतेचाच पैसा आहे.  शेकडो वर्षांची परंपरा आम्ही जपतो आहोत. वारकऱ्यांवर बोलणे चुकीचे आहे. सरकार अनुदान देत असेल तर ते त्यांचे कामच आहे. आमचा पैसा टॅक्स घेऊन सरकारला जमा होतो, अशी प्रतिक्रिया यावेळी वारकऱ्यांनी दिली आहे. 


संजय राऊतांच्या वक्तव्याची कीव वाटते : दादा भुसे


दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथील पालखी सोहळ्यात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) सहभागी झाले. यावेळी ते म्हणाले की, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखीचे दर्शन घेतले. सरकारकडून पालखीला 20 हजारांचे अनुदान आणि वारकऱ्याला अपघाती पाच लाखांचा विमा सरकारकडून देण्यात आला आहे.  भरपूर पाऊस पडो आणि पिक पाणी यंदाच्या वर्षी जोमाने येवो, अशी प्रार्थना निवृत्तीनाथांच्या चरणी केली आहे. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याची कीव करावी वाटते, वारकऱ्यांबद्दल असे बोलणे चुकीचे आहे, असे म्हणत दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. 


आणखी वाचा 


Girish Mahajan : 'एवढा उन्माद करू नका, मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही'; गिरीश महाजनांचा ठाकरे-राऊतांना इशारा