Mood of the Nation 2024: नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि देशाचा एकंदरीत मूड बदलल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकांनंतर देशात एनडीए सरकार स्थापन झालं खरं, पण भाजपला मात्र एकहाती सत्ता स्थापन करता आली नाही. भाजपनं मित्रपक्षांच्या मदतीनं केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं. पण जर आज देशात निवडणुका झाल्या तर? याचबाबत देशातील लोकांचा मूड जाणून घेण्यासाठी आज तकनं सी-व्होटरच्या सहकार्याने 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षण केलं आहे. या माध्यमातून देशात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणाचं सरकार बनणार? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. एनडीएला 44 टक्के मतं मिळू शकतात, इंडिया ब्लॉकला 40 टक्के मतं मिळू शकतात आणि इतरांना 16 टक्के मतं मिळू शकतात. जर आपण जागांवर बोललो तर एनडीएला 299 जागा मिळू शकतात, इंडिया ब्लॉकला 233 जागा मिळू शकतात, तर इतरांना 11 जागा मिळू शकतात, असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 


देशात आज निवडणुका (Elections 2024) झाल्या तर भाजपला 38 टक्के, काँग्रेसला 25 टक्के आणि इतरांना 37 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. पक्षनिहाय जागांबाबत बोलायचं झाल्यास, भाजपला 244, काँग्रेसला 106 आणि इतरांना 193 जागा मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल अडीच महिन्यांपूर्वी म्हणजेच, 4 जून रोजी आले होते. यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला 99 जागा मिळाल्या (राहुल गांधींनी 2 जागांवर निवडणूक जिंकली, नंतर त्यांनी वायनाडची जागा सोडली.)


त्यामुळे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएनं 293 जागा जिंकल्या होत्या, तर इंडिया आघाडीला 234 जागा जिंकण्यात यश आलं होतं. आता MOTN च्या सर्वेक्षणानुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील NDA च्या 6 जागा वाढत आहेत, तर इंडिया ब्लॉकची एक जागा कमी होऊ शकते. मात्र, पक्षनिहाय जागांवर बोलायचं झाल्यास, आज निवडणूक झाल्यास काँग्रेसच्या 7 जागांमध्ये वाढ होऊ शकते, तर भाजपच्या केवळ 4 जागा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


पंतप्रधानपदासाठी आवडता नेता कोण?


आज लोकसभा निवडणूक झाल्यास पंतप्रधान म्हणून पहिली पसंती कोणाला असेल? हे जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. यामध्ये 49 टक्के लोकांना नरेंद्र मोदी आणि 22 टक्के लोकांना राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे.


37 टक्के लोकांचा मोदी सरकारवर विश्वास 


सर्वेक्षणादरम्यान लोकांना विचारण्यात आलं की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल तुम्ही कसे पाहतात? यावर 37 टक्के लोकांनी मोदी सरकारवर विश्वास असल्याचं सांगितलं, तर 14 टक्के लोक भाजपच्या उद्दामपणावर नाराज आहेत, तर 12 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, विरोधी पक्ष खूप मजबूत झाला आहे. सर्वेक्षणात 11 टक्के लोकांनी अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे, तर 5 टक्के लोकांच्या मते सत्ताविरोधी लाट आहे.


आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान कोण?


भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट पंतप्रधान कोण आहे, या प्रश्नाच्या उत्तरात 52 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, नरेंद्र मोदी हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान आहेत, तर 12 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, अटल बिहारी वाजपेयी आणि इतर 12 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, मनमोहन सिंह. 10 टक्के लोक मानतात की, इंदिरा गांधी आणि इर्वरित 5 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, आजपर्यंतचे सर्वोत्तम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते.