मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांच्या निवडणुकीची (Rajyasabha Eelection 2024) चर्चा होती. आता या दोन्ही जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन पाटील (Nitin Patil) आणि भाजपाचे धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याव्यतिरिक्त अन्य दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण शेवटी नितीन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 


अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद


राज्यसभेच्या दोन जागांसाठीच्या निवडणुकीला भाजपा पक्षाकडून धैर्यशील पाटील यांना तिकीट देण्यात आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नितीन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत दोन अपक्षांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले होते.परंतु अर्जाच्या पडताळणीमध्ये अपक्षांच्या वतीने भरण्यात आलेल्या अर्जावर अनुमोदकांच्या साह्या नसल्याचे समोर आले. त्यामुळे हे तिन्ही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले. सोमवारी राष्ट्रवादी आणि भाजपाच्या उमेदवारांना राज्यसभेवर नियुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 


अजित पवार यांनी दिले होते आश्वासन


लोकसभा निवडणुकीदरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी साताऱ्यातील वाई येथे सभा घेतली होती. साताऱ्याच्या जागेवरून महायुतीचा उमेदवार निवडून आल्यास नितीन पाटील यांना खासदार करतो, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर नितीन पाटील यांना खासदारकीची संधी कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी नितीन पाटील यांना तिकीट दिले आणि आणि आपले आश्वासन पूर्ण केले. आता नितीन पाटील राज्यसभेचे खासदार होणार आहेत. 


नितीन पाटील यांचे बंधून वाईचे आमदार


नितीन पाटील हे मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. मकरंद बंधू वाई-महाबळेश्वरचे आमदार आहेत. नितीन पाटील हे सातारा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. नितीन पाटील यांचे वडील लक्ष्मणराव पाटील हे खासदार होते. 


धैर्यशील पाटील माजी आमदार 


दुसरीकडे भाजपाने धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली होती. धैर्यशील पाटील हे मूळचे रायगड जिल्ह्यातील आहेत. धैर्यशील पाटील हे माजी आमदार आहेत. सध्या ते रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी याआधी रायगड, रत्नागिरी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालू केली होती. परंतु तेव्हा त्यांना तिकीट मिळाले नाही. मात्र आता त्यांना राज्यसभेच्या रुपात खासदारकी मिळणार आहे.


हेही वाचा :