सोलापूर : उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यानेच ते अजितदादांची पक्षातून हकालपट्टी करतो असं वक्तव्य करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले. उत्तम जानकारांसाठी ज्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या त्या कार्यकर्त्यांना सोडून आमदारकीसाठी उत्तम जानकर हे मोहिते पाटलांकडे लोळण घ्यायला गेले अशी टीकाही त्यांनी केली. अजित पवार पक्षातून माझी हकालपट्टी काय करणार, मीच त्यांची हकालपट्टी करतो असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी केलं होतं. त्याला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं.

उमेश पाटील म्हणाले की, अजितदादांची पक्षातून हकालपट्टी करतो असे डोक्यावर परिणाम झालेले विधान उत्तम जानकर यांनी केले. मुळात अजितदादांबद्दल बोलावं एवढी जानकारांची पात्रता नाही. धनगर समाजावर मोहिते पाटलांनी पिढ्यानपिढ्या अन्याय केला. त्याचा उठाव म्हणून तेथील जनता जानकरांच्या पाठीशी होती. त्या जनतेला वाऱ्यावर सोडून जानकर हे आता मोहिते पाटलांकडे गेले. त्यामुळे तेथील जनता जानकारांच्या पाठीशी जाणार नाही.

फक्त आमदारकीचा शब्द मिळाल्यामुळे उत्तम जानकर हे आता मोहिते पाटलांकडे गेल्याने ते किती लबाड आणि फसवे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशी टीका उमेश पाटील यांनी केली. 

काय म्हणाले होते उत्तम जानकर? 

महायुतीची साथ सोडून शरद पवार आणि मोहिते पाटलांसोबत गेल्यानंतर उत्तम जानकरांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. अजित पवार हे मला पक्षातून काढून टाकणार काय असा सवाल त्यांनी विचारला होता. मी पक्षाचा संस्थापक सदस्य असल्याने मीच अजित पवारांना पक्षातून काढून टाकतो असं उत्तम जानकर म्हणाले होतं. 

जर शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षातून अजित पवार त्यांना काढून टाकत असतील तर मीही अजित पवारांना राष्ट्रवादीतून काढून टाकू शकतो असं जानकर म्हणाले होते. 

अजित पवारांचा पराभव केल्याशिवाय माढ्यात येणार नाही

माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी त्यांचे मोहिते पाटलांसोबतचे 30 वर्षांचे वैर मिटवून त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार आणि माळशिरसमधून उत्तम जानकर हे आमदार असं समीकरण ठरलं आहे. उत्तम जानकरांनी शरद पवारांना साथ दिल्यामुळे मोहिते पाटलांचं पारडं जड झाल्याचं चित्र आहे. उत्तम जानकरांमुळे बारामतीमधील धनगर समाजाच्या मतदानाचा फायदा हा सुप्रिया सुळेंना होणार असल्याची चर्चा आहे. 

शरद पवारांना साथ देताच उत्तम जानकरांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवारांचा बारामतीमधून पराभव केल्याशिवाय मी माढ्यात परत येणार नाही असा निश्चय त्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवला आहे. 

ही बातमी वाचा: