मुंबई: एकीकडे काँग्रेस नेतृत्वाला जिंकण्याची जिद्द नाही, पक्ष पुढे नेण्याची इच्छा नाही, तर दुसरीकडे नाना पटोलेंसारखे (Nana Patole) विद्वान लोक राज्यातील काँग्रेस चालवतात, त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सांगितलं. काँग्रेसमध्ये असतानाही आपण मोदींना भेटायचो, पण त्याचं कारण सर्वांसमोर सांगत नाही असंही ते म्हणाले. 'एबीपी माझा'शी संवाद साधताना अशोक चव्हाणांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्याचा प्लॅन कसा ठरला हे सांगितलं.
अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपमध्ये मला पूर्ण मानसन्मान मिळतोय. माझ्यावर जी जबाबदारी पक्षाने दिली आहे ती मी चोखपणे पूर्ण करतोय. यंदा देशात मोदी सरकार आणि राज्यात महायुतीचं सरकार येईल. मोदींनी जेव्हा माझा हात धरत लोकांना अभिवादन केलं तो क्षण माझ्यासाठी अमूल्य होता. तसं मी मोदीजींना पक्षात येण्याआधीही बऱ्याच वेळेला भेटलोय. पण बऱ्याच भेटींबद्दल कॅमेरासमोर बोलता येत नाही.
काँग्रेसच्या नेतृत्वाला जिंकण्याची इच्छा नाही
मी काँग्रेस पक्ष सोडला, कारण ज्या पक्षाचं भविष्य नाही त्या पक्षात आपलं भविष्य काय होणार? जिंकण्याचं जिद्द नाही, पक्ष पुढे नेण्याची पक्षनेतृत्वालाच इच्छा नाही. तिथे थांबून मी करणार काय? काँग्रेसच्या आजच्या परिस्थितीसाठी जबाबदार आहे आजचं नेतृत्व.
नाना पटोलेंसारखे विद्वान जर पक्ष चालवतात तर काय होणार?
नाना पटोले सारखे थोर विद्वान जर पक्ष चालवत असतील तर त्या पक्षात काय राहणार? नाना पटोले सगळं स्वतःच्या इच्छेनुसार करतात. कोणालाही विश्वासात न घेता नाना पटोले परस्पर निर्णय घेतात. वर्षा गायकवाड या मुंबईच्या अध्यक्षा आहेत. पण त्यांना न विचारता मुंबईच्या जागांचं वाटप झाला आणि उमेदवारही घोषित झाले. आता ही कोणती लोकशाही ज्याबद्दल कांग्रेस बोलत असते?
उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या दबावाखाली कांग्रेस नेते झुकले. शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाला ज्या जागा हव्या होत्या त्या त्यांनी घेतल्या आणि जे उरलंसुरलं आहे ते कांग्रेसला मिळालं. यावर राज्य नेतृत्वाने काहीच नाही केलं. मी जर काँग्रेसमध्ये असतो तर हे होऊ दिलं नसतं.
मी बाहेर पडल्यानंतर हिंमत का दाखवली नाही?
माझ्यावर नाना पटोले आरोप करतात की जागावटापाची बोलणी केल्यानंतर पक्षा सोडला म्हणून कांग्रेसला नुकसान झालं. मी सुरुवातीची चर्चा निश्चितपणे केली, पण मला जे दिसलं ते पाहताच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. मी पक्षातून बाहेर पडलो तर नाना पटोले आणि इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासमोर हिंमत दाखवून जागा मागून का घेतल्या नाहीत?. स्वतःच्या अपयशाचं खापर हे दुसऱ्यांवर फोडायची यांची जुनी सवय आहे असं अशोक चव्हाण म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेकजण काँग्रेस सोडतील
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आणखी मोठी राजकीय भूकंप होतील, बरेच नेते मोठा निर्णय घेतील असा दावा अशोक चव्हाण यांनी केला. ते म्हणाले की, सगळे मोठे नेते सोडून जात आहेत. संजय निरुपम, मिलिंद देवरा यांच्यासारखे चांगले नेते सोडून गेले. असे असंख्य नेते जे नाराज आहेत, ज्यांना आपल्या भविष्याची चिंता आहे ते लवकरच योग्य निर्णय घेतील याची मला खात्री आहे.
आदर्श प्रकरण काँग्रेसच्या काळातील
आदर्श घोटाळ्यावरून उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे काही बोलायला नाही म्हणून ते अशी टीका करतायत. आदर्श हा एक संपलेला विषय आहे. त्यात भाजपला जोडणे चुकीच. आदर्श हा विषय झाला काँग्रेसच्या काळात, मग त्यात भाजपचा काय संबंध? कांग्रेस सरकार असताना हे सगळं झालं, कांग्रेसने सांगावं काय खरं काय खोटं.
राहुल गांधी यांनी माझ्याबद्दल केलेलं विधान पूर्णपणे खोटं आहे. मी कधीच सोनिया गांधी समोर गेलो नाही, रडलो नाही असा दावा अशोक चव्हाण यांनी केला.
कसल्याही अपेक्षेने भाजपमध्ये गेलो नाही
आता भविष्य भाजपसोबत आहे तर भाजपला पुढे नेण्याचं काम मी करणार असं सांगत अशोक चव्हाण म्हणाले की, मी काही मिळेल यासाठी भाजपमध्ये गेलो नाही. पण जी जबाबदारी पक्ष नेतृत्व देईल ती स्वीकारुन काम करणार. माझी मुलगी राजकरणात नुकतीच आली. ती आता सगळं बघतेय, शिकतेय. तिला काय मिळेल, पक्ष काय देईल माहित नाही. पण आपण काम करत रहायचं हेच आमचं धोरण आहे.
ही बातमी वाचा: