मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केले. मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही. आपण 200 ते 225 विधानसभेच्या जागांवर लढण्याची तयारी करतोय, असे राज ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या या घोषणेमुळे मनसेचे (MNS) नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या मनसेने खरोखरच 200 ते 250 मतदारसंघात निवडणूक लढल्यास विधानसभेला (Vidhan Sabha Election 2024) चुरस वाढू शकते. मात्र, लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे हे शेवटपर्यंत आपला निर्णय कायम ठेवणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. 


यावेळी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील ठाकरे गटाच्या कामगिरीवरही टिप्पणी केली. त्यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान हे मराठी माणसाचे नाही. लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग आहे. उद्धव ठाकरेंना झालेले मतदान हे मोदींविरोधात मतदान आहे. त्यामुळे आता जनता मनसेची वाट पाहत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप ठरलेले नाही. मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही. आपण विधानसभेला 200 ते 250 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी करत आहोत, असे राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितले. राज ठाकरे यांचे हे वक्तव्य पाहता मनसे पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. 


मनसेच्या बैठकीत काय घडलं?


मनसेचा तूर्तास स्वबळाचा नारा. राज्यातील सर्वच जागांवर तयारी करण्याचे राज ठाकरेंकडून पदाधिकारी आणि नेत्यांना आदेश.  मतदार संघनिहाय आढावा घेण्यासाठी कोण टीम असतील या तुम्हाला सांगण्यात येणार नाही. ते त्यांचं काम करतील आणि रिपोर्ट देतील.  विधानसभेला जे उमेदवार दिले जाणार ते पारदर्शक आणि पक्षाचे प्रामाणिक असलेले लोकच असतील.  एक महिन्याने संपूर्ण राज्यातला मतदारसंघ आणि आढावा घेतल्यानंतर पुन्हा बैठक होईल.  राज्यातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी टीम बनवल्या जाणार. या सर्व टीम राज्यभर मतदारसंघनिहाय आढावा घेतील.  पक्ष सरचिटणीस आणि नेते पदाधिकाऱ्यांकडून मतदारसंघनिहाय माहिती मागवतील ती लवकरात लवकर द्यावी  पक्ष संघटन वाढवण्यासाठी सर्वांनी अथक प्रयत्न करण्याची सूचना राज ठाकरे यांनी केली. युती आघाडी याबाबत लक्ष देऊ नका, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 


आणखी वाचा


बिनशर्त पाठिंबा, तरीही राज ठाकरे यांना शपथविधीला का बोलावलं नाही? प्रकाश महाजन म्हणाले...