ShivendraRaje Bhosale Meets Devendra Fadnavis : सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटत नाहीये. भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. दरम्यान आता, आमदार शिवेंद्रराजे भोसलेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. शिवेंद्रराजे भोसले (ShivendraRaje Bhosale) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. दरम्यान, या भेटीनंतर सातारा लोकसभा मतदारसंघाच तिढा सुटतो का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. एका बाजूला उदयनराजे दिल्लीतील पक्षनेतृत्वाच्या भेटीला गेले आहेत, तर दुसरीकडे शिवेंद्रराजे भोसलेंकडून फडणवीसांची भेट घेतली जाणार आहे.
उदयनराजे साताऱ्यातून लोकसभा लढवण्यास इच्छुक
सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयराजे भोसले लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. भाजपने लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या. या दोन्ही याद्यांमध्ये उदयनराजे यांचे नाव नाही, त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी असलेली पाहायला मिळाली होती. उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये उदयनराजे यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत होता.
माढा, बारामतीनंतर साताऱ्याबाबत खलबतं
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान या मतदारसंघात मोहिते-पाटलांचा एक नाराज असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे बारामतीमध्ये शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. तर साताऱ्यात अद्याप उमेदवार जाहीर झाला नसल्याने इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरुच आहे. तीन मतदारसंघाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मॅरथॉन बैठका सुरु आहेत. दरम्यान, सातारा मतदारसंघातून भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयराजेंचा पराभव
उदयराजे भोसले यांनी 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर लढली. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. मात्र, काही आठवड्यांमध्येच खासदारकीचा राजीनामा देत ते भाजपवासी झाले. दरम्यान या मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभेच्या निवडणुकीबरोबर घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव केला.
इतर महत्वाच्या बातम्या
अजित पवारांची नवी चाल, शरद पवारांचा डाव उलटवण्यासाठी सुनील तटकरे अनंतराव थोपटेंच्या भेटीला