सांगली: आपल्या पुरोहिताची, मंत्राची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण स्टेजवर बसणार नाही, असा पवित्रा मी अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्याबाबत बारामतीमधील एका सभेत घेतला होता, अशी माहिती  भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी दिली. साधेपणा हे आपले वैशिष्ट्य आहे. चुका आपल्या असतील तर ऐकून घेऊन त्या दुरुस्त करणे, हे आपले काम आहे. पण विनाकारण कोणी शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचे नाही, असंही मेधा कुलकर्णी म्हणाल्या. 


मेधा कुलकर्णी नेमकं काय म्हणाल्या?


अमोल मिटकरी बारामतीमध्ये ज्या स्टेजवर येणार होते, त्या स्टेजवर मी येणार नाही अशी भूमिका घेतल्यावर मिटकरी त्या सभेला आलेच नाही, असा किस्सा मेधा कुलकर्णी यांनी सांगितला. त्यामुळे जे चुकीचे आहे त्याला चुकीचे म्हणा, असंही मेधी कुलकर्णी म्हणाल्या. सांगलीत ब्राह्मण समाज संघटनेतर्फे ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांचा सत्कार खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.


देशातील सर्व हिंदूंना एकत्र करायचे आहे-


देशातील सर्व हिंदूंना एकत्र करायचे आहे. देशाला पुढे नेण्यासाठीच्या कामासाठी एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरणार नाहीत. सर्वांनी देशासाठी काम करायला पाहिजे. प्रश्न समजून घेऊन देशाला पुढे नेऊया असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले. ब्राह्मण समाज चुकत असेल तर जरूर ऐकून घ्या. त्यामध्ये दुरुस्ती करा. मात्र विनाकारण कोणी शेपटीवर पाय दिला तर सोडायचे नाही असेही मेधा कुलकर्णी म्हणाल्या. ब्राह्मण समाज साडेतीन टक्के आहे. त्यांच्यावर विविध कारणातून टीका होत असते. ब्राह्मण समाजावर होणारी टीका व नकारात्मक भावना कामाच्या माध्यमातून नष्ट करा, असे आवाहन खासदार मेधा कुलकर्णी यांनी केले. यावेळी श्रीमंत पुष्कर सिंह पेशवे, युवराज श्रीमंत आदित्य राजे विजयसिंह पटवर्धन ,श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, राज लक्ष्मी राजे पटवर्धन आदी उपस्थित होते.


ही बातमी वाचा:


बीड अन् जालन्याचा निकाल काय असेल, तिथं तुम्ही सांगेल तेच लोकांनी ऐकलंय?; पत्रकाराच्या प्रश्नावर जरागेंचं उत्तर