Aashutosh Gokhale : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून 'जब वी मेट' हे प्रायोगिक नाटक सादर करण्यात आलं होतं. हे नाटक 2 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलं. जब वी मेट या नावाच्या या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न आला होता. मात्र या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला. यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली. या नाटकांत राम आणि सीता यांच्यासंदर्भात काही आक्षेपार्ह दृष्य दाखवण्यात आली होती. त्यामुळे हा सगळा राडा झाला होता. यावर अभिनेता आशुतोष गोखलेने (Aashutosh Gokhale) त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
तो अत्यंत लाजीरवाणा प्रकार होता - आशुतोष गोखले
ललित कला केंद्रामध्ये जे काही झालं त्यावर आशुतोष म्हणाला की, जे काही झालं तो अत्यंत दुर्दैवी आणि लाजीरवाणा प्रकार आहे. या व्यतिरिक्त माझी काही प्रतिक्रिया नाहीये. त्या मुलांनी जे नाटक सादर केलं एकतर ते पूर्ण होऊ दिलं नाही. मी जो काही त्या नाटकाचा शेवट ऐकला, तो मला आता सांगायचाही नाही. पण तो सकारात्मक होता, अजिबात वाईट नव्हता. पण यामध्ये लक्ष कुठे केंद्रीत करण्यात आलं सीतेचं पात्र करणारी जी मुलगी आहे, तिची भाषा काय आहे त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या. पण मला या सगळ्यावर एकच वाटतं की, भावना दुखावल्या गेल्यावर त्या सगळ्याची प्रतिक्रिया मारहाण कशी असू शकते. हेच मला पटत नाही. भावना दुखावल्या गेल्या, तुम्ही काय करु शकता, की उठा आणि निघून जा. त्यामुळे कशाचीही प्रतिक्रिया ही मारहाण असू शकत नाही.
ते नाटक त्या मुलांना उगाच सुचलं नसेल - आशुतोष गोखले
पुढे आशुतोषने म्हटलं की, 'त्यांनी जे काही सादर केलं तो त्यांच्या नाटकाचा भाग होता. ते नाटक अजिबातच स्क्रिप्ट लिहून आलंय, सेन्सॉर होतंय असं नव्हतं. त्यांची ती परीक्षाच ती होती. संहितेपासून ते सादरीकरणापर्यंत त्यांना सगळं करावं लागतं. त्यानंतर समोर बसलेले परीक्षक आणि त्यांचे शिक्षक त्यांना सांगतात की, त्यांचं काय चुकलं आणि काय नाही ते. बरं ते नाटक 20 ते 30 मिनिटांचं असतं, तेही पूर्ण होऊ दिलं नाहीत. आता ती त्या कॉलेजमधली मुलं आहेत, त्यांना उगाचचं सुचलं नसेल ना की, आज हे नाटक करावं. आजूबाजूला जे पाहताय, जी परिस्थिती आहे, जे प्रश्न त्यांना भेडसावत आहेत, त्याचवर त्यांनी ते नाटक सादर केलं होतं. कुठल्याही काळातलं नाटक हे त्या काळातली प्रश्न मांडणारं किंवा उत्तर देणारं नाटक असतं. तर मग अशा प्रकारचं नाटक सुरु असताना तुम्ही आजूबाजूची परिस्थिती बदलाल की ते नाटक बंद पाडाल. त्यातच ही मारहाण करणारी लोकं म्हणजे निर्बुद्ध याशिवाय मला दुसरं काही बोलायचं नाही. म्हणजे त्यांना परिस्थिती माहित नाही काय आहे, नाटक माहित नाही. कुठूतरी बाहेरुन कळालं की असं असं नाटक आहे, तिथे जाऊन मारायंच आहे, त्यांनी तसं केलं.'
आजूबाजूचं वातावरणच फार दुर्दैवी आहे - आशुतोष गोखले
'आता वाईट गोष्ट ही आहे की, ती त्या मुलांना आणि तिथल्या प्रविण भोळे सरांना पोलिसांनी पकडलं तिथे तोडफोड झाली. बरं ज्यांनी हे केलं त्यांना काही नाही झालं. इतकं झाल्यानंतर जेव्हा त्या मुलांना बेल मिळाली तेव्हा त्यांना बेल का मिळाली म्हणून ललित कला केंद्र पुन्हा जाऊन फोडलं. तेव्हा तर तिथे कोणतं नाटक सुरु नव्हतं. मग ते का फोडलं. तुमच्या भावना दुखावल्या गेल्या, तेव्हा तुम्हाला जे करायचं ते तुमचं करुन झालंय, मग ही पुढची तोडफोड का होती. नंतर त्या मुलांना घरी पाठवण्यात आलं. आता ते पुन्हा सुरु झालंय.'
'पण आपल्याला मुंबई-पुण्यासारख्या शहरात राहून, एका राजकीय विचारांचा भाग असताना जेव्हा सांगितलं जातं की जाऊन फोडा आणि आपण ते करतो, तेव्हा कळत नाही की, ती मुलं कुठल्या कुठल्या भागातून आलेली आहेत. ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेली मुलं आहेत. त्यांना या क्षेत्रात काहीतरी करायंच आहे,त्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाहीये. त्यांना माहित नाही, काही करायचं आहे. ती मुलं जेव्हा असं काहीतरी करतात आणि त्यांना मारहाण होते, तेव्हा त्यांच्या पालकांना भीती नसेल का वाटली त्यांना परत पाठवायला. हा विचारच येत नाही. मग तुम्ही कोणता समाज सुधारताय, मग कुठेत तुमचे राम. राम आयेंगे, राम आयेंगे कुठे आलेत राम की फक्त अयोध्येत जाऊन बसलेत.त्यामुळे राम आलेले नाहीयेत, ते गेलेत. त्यामुळे सध्या फार दुर्दैवी वातावरण आहे आजूबाजूला', असं म्हणत आशुतोषने त्यावर स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.