बीड : राज्यात यंदा चर्चेत राहिलेल्या लोकसभा मतदारसंघात बीड (Beed) आणि परभणी मतदारसंघाचा समावेश होता. तर, मराठा आरक्षणामुळे चर्चेत आलेल्या अंतरवाली सराटीतील जालना लोकसभा मतदारसंघाकडेही अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, मराठवाड्यातील जालना, परभणी आणि बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा प्रभाव आणि वावर या मतदारसंघात राहिला आहे. निवडणूक काळातही त्यांनी येथील मतदारसंघात मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. कोणाला पाडायचंय त्याला पाडा, असे आवाहन मराठा समाजाला केले होते. त्यामुळे, या दोन ते तीन मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 


बीड लोकसभा मतदारसंघात थेट जातीय समीकरणावर ही निवडणूक लढली गेल्याचं तेथील जाणकार सांगतात. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच या मतदारसंघात जातीय वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात येथे थेट लढत झाली. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याचं दिसून आलं. मतदानादिवशी येथे बोगस मतदान झाल्याचा आरोपही बजरंग सोनवणे यांच्यावतीने करण्यात आला. तर, मराठा विरुद्ध ओबीसी असा थेट संघर्ष मतदारसंघात झाल्याचं दिसून आलं. या वादाचा लाभ बजरंग सोनवणेंना झाल्याची चर्चा आहे. 


जरांगेंचा फायदा बीड अन् परभणीत


परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय (बंडू) जाध यांनीही मनोज जरांगेंचा फायदा मला आणि बीडमधील बजरंग सोनवणे यांना झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, बीड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात थेट मराठा आरक्षण आंदोलनाचा व मनोज जरांगे यांचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारास झाला आहे. त्यात, या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार मराठा आहेत. तर, अंतरवाली सराटी गाव असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघात भाजप नेते रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याणराव काळे यांच्यात थेट लढत झाली. मात्र, येथे जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा नेमकं कोणाला झाला, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता, त्याच अनुषंगाने पत्रकारांनी मनोज जरांगेंना प्रश्न विचारला होता. त्यावर, जरांगेंनी थेट उत्तर देणं टाळलं.  


पत्रकारांच्या प्रश्नावर जरांगेंचं उत्तर   


बीड आणि जालन्याचा निकाल काय असेल, तुम्ही सांगेल तेच लोकांनी तिथं केलंय, असे म्हणत पत्रकारांनी मनोज जरांगे यांना सवाल केला होता. पत्रकारांच्या प्रश्नावर जरांगे यांनी सावधपणे भूमिका घेत उत्तर दिलं. मी निवडणुकीत नाही, माझा समाजही नाही. मी कोणाचं नाव घेतलंच नाही ना, की याला पाडा. तसं म्हटलं असतं तर आमची प्रतिष्ठा पणाला लागली असती. जनतेला अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, फक्त त्यांना एवढचं सांगितलं आहे की पाडा. मताची ताकद दिसली पाहिजे, मग आता मी सांगितलं नाही, यालाच पाडा. त्यामुळे आमची प्रतिष्ठा असण्याचं कारण नाही. आम्ही न सांगून जर सांगितलं म्हणायची त्यांच्यात मस्ती असेल तर विधानसभेला सांगून पाडू, असे म्हणत जरांगेंनी थेट इशाराच दिला. 



तर 288 मतदारसंघात उमेदवार उभे करणार


लोकसभा निकालानंतर, 4 जूननंतर आपण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, मराठा आरक्षण, बीड लोकसभा, जातीवाद आणि उपोषणावरही त्यांनी भाष्य केलं. यावेळी, विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात त्यांनी मोठी घोषणाच केली आहे. जर मराठा समाजाला ओसीबीतून आरक्षण मिळालं नाही, तर विधानसभेला 288 मतदारसंघातून उमेदवार उभे करणार असल्याची घोषणाच जरांगेंनी केली आहे. जरांगेंच्या या घोषणेनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोषही केला. कुणबी आणि मराठा एकच आहेत, त्यामुळे जर ओबीसीतून आरक्षण दिलं नाही. तर, विधानसभेला 288 मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं जरागें यांनी म्हटलं.  


हेही वाचा


..तर विधानसभेला 100 टक्के 288 उमेदवार उभे करणार, जरांगेंची घोषणा; पडळकर म्हणाले, ओबीसीतून आरक्षण नाही मिळणार