Sharad Pawar On Reservation : शरद पवारांच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्याचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध, राजकीय घराणेशाहीचं आरक्षण बंद करण्याची मागणी
Sharad Pawar On Reservation : शरद पवारांच्या आता आरक्षण आरक्षण बास करा वक्तव्याचा मराठा क्रांती मोर्चाने निषेध केला आहे. तसंच राजकीय घराणेशाहीचं आरक्षण बंद करण्याची मागणी देखील केली आहे
Sharad Pawar On Reservation : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आरक्षणाबाबत (Reservation) केलेल्या वक्तव्याचा मराठा क्रांती मोर्चाकडून (Maratha Kranti Morcha) निषेध करण्यात आला आहे. "आरक्षण बंद करायचं असेल तर राजकीय घराणेशाहीचं आरक्षण बंद करा. तुम्ही कमावून ठेवलंय, मराठ्याच्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्यांच्या पालकांचं आयुष्य जातं, तिथे लक्ष द्या," असं मराठा क्रांती मोर्चाने म्हटलं आहे. तसंच शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही, असा आरोपही मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला.
"आता आरक्षण आरक्षण बास झालं, तरुण पिढीचं अर्थकारण बदलणं गरजेचं असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. आरक्षणाशिवाय अर्थकारणाचा विचार व्हायला हवा," अशी स्पष्टोक्ती शरद पवार यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.
शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही : मराठा क्रांती मोर्चा
शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करताना मराठा क्रांती मोर्चाने टीका देखील केली आहे. "आरक्षणच बंद करायंच असेल राजकारणातील घराणेशाहीचे आरक्षण बंद करा. सुप्रिया सुळे, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार हे आरक्षण आपण सुरु केलं आहे यामुळे आपल्या शंभर पिढ्या खातील एवढा पैसा आपल्याकडे आहे. पण एखाद्या मराठाच्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्यांच्या पालकांचं अख्खं आयुष्य जातं. शेतकरी आत्महत्या करत आहेत. पास काढायला मिळत नाही म्हणून मुली आत्महत्या करत आहेत. याकडे आपण बारकाईने लक्ष द्या. पवार साहेब आपल्यामुळेच मराठा समाजाला आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही, असं मराठा क्रांती मोर्चा समन्वयक अंकुश कदम यांनी म्हटलं.
शरद पवार काय म्हणाले होते?
शरद पवार काल (28 डिसेंबर) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातून त्यांनी आरक्षण, शेतकरी आणि मराठा समाज अशा विषयांवर भाष्य केलं. या कार्यक्रमात 'आरक्षणाकडून अर्थकारणाकडे' या विषयावर झालेल्या चर्चासत्राचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले की, "एक काळ होता की आरक्षणासाठी संघर्ष केला, मागण्या केल्या. पण आता हा विचार केला की, आता आरक्षण-आरक्षण बास झालं, जोपर्यंत नव्या पिढीचं अर्थकारण बदलत नाही तोपर्यंत समाजातील त्यांचं स्थान बदलणार नाही."
VIDEO : Sharad Pawar : आरक्षण आरक्षण आता बास झालं, तरुण पिढीचं अर्थकारण बदलणं गरजेचं : शरद पवार : Abp Majha