जालना: मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच मराठा आंदोलकांची सोमवारी रात्री सुटका करण्यात आली. हे पाचही जण मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे निकटचे सहकारी आहेत. तर त्यापैकी तीन जण हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दिशा ठरवणाऱ्या कोअर कमिटीचे सदस्य आहेत. या सगळ्यांना पोलिसांनी सोडून दिल्याने आता मनोज जरांगे पाटील आता नव्याने आंदोलनाची हाक देतात का, हे पाहावे लागेल.


मनोज जरांगे यांनी रविवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन टीका केली होती. त्यांच्या या टीकेचे भाजपच्या वर्तुळात संतप्त पडसाद उमटले होते. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांना मला सलाईनमधून विष देऊन ठार मारायचे आहे. त्यापेक्षा मीच मुंबईतील सागर बंगल्यावर येतो, फडणवीसांना मला गोळ्या घालाव्यात, असे म्हणत मनोज जरांगे पाटील तडकाफडकी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर  पोलिसांनी वेगाने हालचाली करत अंबड परिसरात संचारबंदी लागू केली होती. तसेच एका रात्रीत अनेक मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले होते. या सगळ्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याच्या निर्णयापासून माघार घेतली होती. तसेच त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेले आमरण उपोषणही स्थगित केले होते. येत्या एक-दोन दिवसांमध्ये आपण पुन्हा राज्यव्यापी दौऱ्यासाठी बाहेर पडू, असे त्यांनी सांगितले होते. आता त्यांचे सहकारी तुरुंगातून सुटल्याने मनोज जरांगे त्यांच्याशी चर्चा करुन पुढील रणनीती निश्चित करतील, असा अंदाज आहे.


मराठा समाज आक्रमक, बारामतीत एकनाथ शिंदे, फडणवीस अन् अजितदादांना नो एन्ट्री?


बारामतीत होणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाला मराठा समाजाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय आहे. येत्या दोन तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. पुणे विभागातील रोजगार मेळावा बारामतीत होणार आहे. तर त्यांच्याच उपस्थितत बारामती एसटी स्टँड आणि पोलीस उपमुख्यालयाचे उद्घाटन देखील उद्घाटन होणार आहे. त्या कार्यक्रमाला मराठा समाजाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. जर मनोज जरांगे पाटील यांनी गाव बंदीचे आदेश दिले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बारामतीत येऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. 


अजय बारसकरांना त्यांच्याच गावातील मराठा समाजाचा विरोध


मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलणारे अजय बारस्कर यांना त्यांच्याच गावातूनच विरोध झाला आहे. अहमदनगरच्या सावेडी ग्रामस्थांच्या वतीने अजय बारस्कर यांचा निषेध व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. अजय बारस्कर यांची भूमिका वैयक्तिक असून सावेडी गावचा या भूमिकेला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सावेडी गावकऱ्यांनी तसा ठराव घेत  अजय बारस्कर यांचा निषेध व्यक्त केला. सावेडीच्या विठ्ठल रुक्मणी मंदिरात ठराव घेऊन निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.


आणखी वाचा


सहा महिन्यांपूर्वी कोणालाही माहिती नसणारा जरांगे पाटील आता शरद पवारांचा बाप झालाय: प्रकाश आंबेडकर