मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. जरांगे-पाटील यांनी रविवारी संध्याकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. त्यानंतर जरांगे पाटील थेट फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर धडकण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले होते. परंतु, पोलिसांच्या कारवाईमुळे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचा मनसुबा धुळीस मिळाला होता. राज्य सरकारने सध्या मनोज जरांगे पाटील यांनी कोणतीही आगळीक खपवून न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संभाषणाचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याच व्हीडिओच्या मुद्द्यावरुन काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री शिंदे यांना धारेवर धरले आहे. उद्या मनोज जरांगे पाटील यांचा जीव गेला तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असणार का?, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.


नेमकं काय घडलं?


आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ झाला. आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर विधानभवनाच्या आवारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाना पटोले यांची भेट झाली. या दोघांच्या गप्पा सुरु झाल्या तेव्हा नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना मजेत विचारले की, हे काय चाललंय?'. त्यावर एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता म्हटले की, 'मर्यादेच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतोच.' नाना पटोलेंनी त्यावर तात्काळ प्रतिप्रश्न केला. 'मला सांगा, तुम्ही त्याला वाढवलं ना?', असे नाना पटोलेंनी विचारला. त्यावर शिंदे यांनी, 'तो सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होते', असे म्हणत काढता पाय घेतला. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा रोख मनोज जरांगे यांच्या दिशेने असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यावरुन मराठा आंदोलक सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना दिसत आहेत. 






काँग्रेस पक्षाने नेमकं काय म्हटलं?


एकनाथ शिंदे यांच्या संभाषणाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून एक ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, कार्यक्रम म्हणजे काय समजायचं साहेब? मुख्यमंत्री साहेब!, ही धमकी आहे का? उद्या जर जरांगे पाटलांचा जीव गेला तर मुख्यमंत्री जबाबदार असणार का?, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. यावर आता मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


आणखी वाचा


...तर कारवाई अटळ! शंभूराज देसाईंचा मनोज जरांगे यांना रोखठोक इशारा