Tripura New CM: त्रिपुरात बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपने नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली आहे. भाजपने मणिक साहा यांना त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर माणिक साहाच्या नावासह अनेक नावांची चर्चा होती. अखेर सर्व नेत्यांनी साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. त्यानंतर आता ते लवकरच शपथ घेऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारू शकतात. माणिक साहा राजभवनाकडे रवाना झाले आहेत.          


कोण आहेत मणिक साहा?


मणिक साहा हे त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष आहेत आणि ते राज्यसभेचे खासदार देखील आहेत. निवडणुकीच्या अवघ्या वर्षभरापूर्वी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत पक्षाने त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरातील भाजप नेते पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करत होते. त्यामागील कारणही बिप्लब देब यांना सांगितले जात होते.






हायकमांडची भेट घेतल्यानंतर बिप्लब देब यांनी दिला राजीनामा 


राजीनामा देण्याआधी शुक्रवारी 13 मे रोजी बिप्लब देब यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीच्या अवघ्या 24 तासांनंतर 14 मे रोजी त्यांनी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा दिल्यानंतर बिप्लब देब यांनी हायकमांडच्या सांगण्यावरूनच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर पक्षाचा आदेश आपल्यासाठी सर्वकाही असून पक्षाकडून जी काही जबाबदारी दिली जाणार, ती आपण पार पाडू, असेही ते म्हणाले आहेत.


संबंधित बातमी: 


Biplab Kumar Deb Resign: त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचा राजीनामा, नवीन मुख्यमंत्री निवडले जाणार