Biplab Kumar Deb Resign: त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पक्षाचा निर्णय आपल्यासाठी सर्वोपरि आहे. हायकमांडच्या सांगण्यावरून त्यांनी आपले पद सोडले आहे. नवीन मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही.


बिप्लव देब यांच्याबाबत संघटनेत होती नाराजी 


मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपुरा भाजप संघटनेत बिप्लव देब यांच्याबाबत नाराजी आहे. यामुळेच दोन आमदारांनीही पक्ष सोडला होता, असं सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. राज्यात पुढील वर्षी 2023 मध्ये निवडणुका होणार असल्याची माहिती आहे. गुजरातच्या धर्तीवर त्रिपुरामध्ये मंत्री ते संघटनेत मोठे फेरबदल होऊ शकतात. राजीनामा दिल्यानंतर ते संघटनेत कोणते पद स्वीकारणार हे अद्याप कळू शकले नाही.






सायंकाळी भाजप विधिमंडळ पक्षाची होणार बैठक


बिप्लव देब यांच्या राजीनाम्यानंतर आज सायंकाळी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांबाबत चर्चा होऊ शकते. 2018 मध्ये बिप्लब देब यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्रिपुरामध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी पक्ष बळकट करण्यासाठी भाजपने राज्याची धुरा नव्या चेहऱ्याकडे सोपवण्याचा पवित्रा घेतल्याचे मानले जात आहे.


कोण होणार नवीन मुख्यमंत्री? 


बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर आता नव्या मुख्यमंत्र्यांची चर्चा जोर धरू लागली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर नव्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब होईल. मात्र भाजप त्रिपुराची धुरा विद्यमान उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा यांच्याकडे सोपवू शकते, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय आणखी काही नावांचीही चर्चा आहे. ज्यामध्ये माणिक साहा आणि प्रतिमा भौमिक यांच्या नावाचाही समावेश आहे. मात्र या सर्वांमध्ये जिष्णु देव वर्मा यांचे नाव सर्वात पुढे असल्याचे सांगण्यात येत आहे.