Navneet Rana : अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (Ravi Rana) आता दिल्लीतून ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) विरोधात आवाज उठवत आहेत. आज राणा दाम्पत्य दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात महाआरती करणार आहे. महाराष्ट्रासारखा धोका दिल्लीत नाही हे राणा दाम्पत्याला चांगलेच माहीत आहे. मुंबईत मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणची घोषणा केल्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर नवनीत राणाने पतीसोबत थेट दिल्ली गाठली आणि तेव्हापासून दोघेही इथेच थांबले आहेत.



कॅनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरात आरती व पठण


अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आज दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण करणार आहेत. दोघेही आज सकाळी 8.30 वाजता त्यांच्या घरापासून पायी मंदिरात जातील, जे त्यांच्या घरापासून सुमारे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारपासून सुटका करण्यासाठी हनुमान चालीसा पाठ करतील, असे राणा म्हणाले होते.


राणा दाम्पत्याला 23 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती


दरम्यान, राणा दाम्पत्य आता दिल्लीत पोहोचले असून आज हनुमान चालीसा पाठ करणार आहे. सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. 


तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यानं जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या. सरकारकडून राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला जात होता. अखेर त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.