Chandrakant Khaire: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेजनक वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीपूरता हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मात्र यावरूनच चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाने केलेल्या आरोपानुसार, खैरे यांनी आनंद दिघे असते तर त्यांनी शिंदेंना उलटं टांगलं असतं, असं वक्तव्य केलं होत. याविरोधातच आता शिंदे गटाकडून खैरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


खैरे यांच्याविरोधातील तक्रारीत काय म्हटलं आहे?


शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र हिम्मतराव जंजाळ यांनी खैरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत ते म्हणाले आहेत की, ''एका वृत्त वाहिनीशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री यांना उद्देशून लटकवुन मारले असते, तसेच अनेकदा बोके, चोर, रीक्षावाला असे शब्द वापरुन अपमानित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे चारित्र्यहनन व प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला आहे.'' आपल्या तक्रारीत ते पुढे म्हणाले आहेत की, ''खैरे विविध माध्यमावर असंवैधानिक भाषेचा वापर करतात. तसेच दंगल घडविण्याच्या दृष्टीने दोन गटात भांडणे लावतात. दंगल घडविण्याचे उद्देशाने नेहमी वक्तव्य करणे व त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करणे, असे अनेक बेकायदेशीर वर्तन ते करत असतात. यामुळे शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विधानामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.''


गुन्हा दाखल झाल्यानंतर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?


मुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी आक्षेजनक वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडण्याचं पाप केलं आहे. हा संताप फक्त महाराष्ट्र नाही, तर देशातील शिवसैनिकांना झाला आहे. शिवसैनिक चिडले आहेत. ते म्हणाले, ''मी म्हणालो एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांचा जो सिनेमा काढला, त्यात ज्यावेळी एक नगरसेवक फुटतो, खोपकर नावाचा, त्याची हत्या होते. दिघे यांना तुरुंगात जावं लागलं होत. ते निर्दोष सुटल्यानंतरही काहीजण अडकले होते. त्यात लिहिलं होत, गद्दारांना शाम नाही.'' खैरे म्हणाले, ''आनंद दिघे जर आज असते, ज्याप्रमाणे खोपकरांचं दाखवण्यात आलं (चित्रपटात) , त्याच प्रमाणे काहीतरी शिक्षा झाली असती.'' तसेच कुठलाही गुन्हा दाखल झाला तरी मला भीती वाटत नाही, असंही ते म्हणाले आहेत.