Aurangabad News: शिवसेना आणि शिंदे गटात शिवसेना कोणाची यावरून वाद सुरु असतानाच निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. त्यामुळे दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देतांना शिंदे गटाबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. यासाठी पोलिसात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे. 


निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवण्याचा निकाल दिल्यावर दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान एबीपी माझाला प्रतिक्रिया देतांना खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. आज आनंद दिघे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना उलटं लटकवलं असते, असे खैरे म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावरून आता शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या खैरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाने केली आहे. 


शिंदे गटाची पोलिसात धाव...


याप्रकरणी औरंगाबाद येथील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेत, चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असून, त्यांच्याबद्दल खैरे यांनी केलेले विधान चुकीचे असल्याचं शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे. त्यामुळे खैरे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी जंजाळ यांनी केली आहे. 


महत्वाच्या बातम्या... 


Shiv Sena Symbol: कागदपत्र न पाहताच निवडणूक आयोगाने निकाल दिला; खैरेंचा गंभीर आरोप


Shiv Sena Symbol: निवडणूक आयोगाला एवढी कसली घाई होती, अंबादास दानवेंची खोचक प्रतिक्रिया