Maharashtra Politics Shivsena: शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं शनिवारी महत्वपूर्ण निकाल दिलाय. चिन्ह गोठवल्यानंतर नव्या चिन्हाची, नव्या नावासाठीही संघर्ष चालूच राहणार आहे. पण या सगळ्या प्रक्रियेत जे प्रश्न तुमच्या मनात आहेत त्याची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.
शिंदे आणि ठाकरे गटाच्या लढाईत शिवसेनेचं धनुष्यबाण तर गोठवलं गेलंय. गेली तीन दशकं जे जिन्ह शिवसेनेच्या अस्मितेचं प्रतीक बनलं होतं, ते आता दोनही गटांना अंतिम निर्णय होईपर्यंत वापरता येणार नाहीय. या निकालामुळे तुमच्या मनात जे प्रश्न निर्माण होतायत, त्याची सोप्या भाषेतली उत्तरं समजून घ्या.
प्रश्न- निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह का गोठवलं?
उत्तर- दोन्ही गटांचा चिन्हावर दावा आहे. त्यात पोटनिवडणूक जवळ आलीय. निवडणूक आयोग तूर्तास हे ठरवू शकत नाहीय की चिन्ह कुणाला द्यायचं. त्यामुळे त्यांनी तूर्तास हे चिन्ह गोठवलं आहे.
प्रश्न- पक्षचिन्हासोबत पक्षाचं नावही का गोठवलं आहे?
उत्तर- पक्षाच्या नावावरही दोन्ही गटांचा दावा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं तेही गोठवलं आहे.
प्रश्न- धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय तात्पुरता आहे का?
उत्तर- हा निर्णय तात्पुरता आहे. पण म्हणून तो केवळ अंधेरी पोटनिवडणुकीपुरताच आहे असं म्हणणं योग्य नाही. कारण अंतिम निवाडा होईपर्यंत हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे असं आयोगानं निकालपत्रात स्पष्ट म्हटलेलं आहे.
प्रश्न- बीएमसी निवडणुकीवेळी दोन्हीपैकी एका गटाला हे चिन्ह पुन्हा मिळेल का?
उत्तर- या प्रश्नाचं उत्तर आत्ताच सांगता येत नाही. अंतिम निवाड्यासाठी आयोग आता किती वेगानं काम करतं यावर ते अवलंबून आहे. अंतिम निवाडा बीएमसी निवडणुकीआधी होती की नाही यावर ते अवलंबून आहे.
प्रश्न- दोन्ही गटांना पक्षाच्या नव्या नावात शिवसेना लावता येणार आहे का?
उत्तर- मूळ शिवसेना हे नाव दोन्ही गटांना वापरता येणार नाही. पण शिवसेना नावातच आणखी काही बाबी जोडून ते वापरता येईल. उदा. लोकजनशक्ती पक्षाच्या बाबतीत दोन गटांमध्ये वाद झाला, त्यानंतर एका गटाला लोकजनशक्ती ( रामविलास) तर दुसऱ्या गटाला राष्ट्रीय लोकजनशक्तीपक्ष असं नाव मिळालं होतं.
प्रश्न- नव्या चिन्हाचं वाटप करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असणार?
उत्तर- दोन्ही गटांना चिन्हासाठी तीन पर्याय द्यायचे आहेत. निवडणूक आयोगाकडे उपलब्ध चिन्हांपैकी हे पर्याय असतात. पण राष्ट्रीय प्रतीकं आणि धार्मिक भावना दुखावेल असं कुठलंही चिन्ह नसेल तर पक्ष स्वत:हूनही काही पर्याय देऊ शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
प्रश्न- शिंदे गट तर पोटनिवडणूक लढणार नाही अशी चर्चा, मग तरी पोटनिवडणुकीआधी चिन्ह का गोठवलं?
उत्तर- निवडणूक लढणं, न लढणं ही त्या पक्षाची राजकीय भूमिका. पण चिन्हाचा गैरवापर होतोय अशी कायदेशीर भूमिका त्यांनी आयोगात घेतली होती. याआधी सुद्धा निवडणूक आयोगानं केवळ एकच गट पोटनिवडणुकीत उतरणार असेल तरी चिन्ह गोठवल्याची उदाहरणं आहेत.
प्रश्न- चिन्हाबाबत निवडणूक आयोगातल्या केसचं आता पुढे काय?
उत्तर- ही केस पुढे चालत राहील. दोन्ही बाजूंनी कागदपत्रं सादर झालेली आहेत. त्यानुसार आयोग बहुमत कुणाच्या बाजूनं याचा निवाडा करण्यासाठी प्रक्रिया चालू ठेवेल.
प्रश्न- भविष्यात दोन्ही गट एकत्रित आले तर चिन्ह, पक्षाचं मूळ नाव शाबूत राहतं का?
उत्तर- हो, दोन्ही गटांची दिलजमाई झाल्यानंतर मूळ चिन्ह, पक्षाचं मूळ नाव हे पुन्हा बहाल होतं. याआधी इतिहासात एआयडीएमके पक्षाच्या फुटीबाबत असं उदाहरण आहे.
दरम्यन, आता जून महिन्यात बंडापासून, पक्षफुटीपासून सुरु झालेली सेनेतली ही अंतर्गत लढाई, आता चिन्हाच्या आणि पक्षाच्या नावापर्यंत येऊन ठेपलीय. आता हा संघर्ष भविष्यात अजून किती तीव्र होतो हे पाहुयात.