Raj Thackeray Majha Vision : मी व्हिजन देण्यासाठी, सांगण्यासाठी आलो नाही, दहा वर्षापूर्वी ज्यांनी व्हिजन सांगितलं त्याचं काय झालं? हे मला विचारायचं आहे. राजकारण्यांकडून व्हिजन घेण्याऐवजी त्यांना व्हिजन देण्याची गरज आहे, असं स्पष्ट मत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केलं. मुंबईतील सुशोभीकरणाबाबत राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. "सुशोभीकरण केलंय, पण संध्याकाळी मुंबई आहे की डान्सबार कळत नाही," असं राज ठाकरे म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते.  
 
आज मला असं वाटतंय आतापर्यंत बरीच सरकार आली गेली, बरेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतर मंत्री एबीपी माझाच्या प्लॅटफॉर्मवर आले. मी आज खरंच व्हिजन देण्यासाठी, सांगण्यासाठी आलो नाही. पण ज्यांनी दहा वर्षापूर्वी  व्हिजन सांगितलं त्याचं काय झालं? हे मला विचारायचं आहे. 
 
काय प्रत्येक वेळेला यायचं आपण एखादी गोष्ट मांडायची. पण मला असं वाटतं की तुमच्या हातामध्ये असलेले जे माध्यम आहे ते माध्यम पॉवरफुल माध्यम आहे. की जे लोक तुमच्या समोर बोलून गेलेले आहेत त्या लोकांना तुम्ही प्रश्न विचारावे. मला असं वाटतं तुम्ही समोर उभे करुन ते काय बोलून गेले आहेत आणि त्याचं पुढे काय झालं याचा लेखाजोखा मांडावा. मला असं वाटतं हे झाल्याशिवाय असल्या कार्यक्रमांना अर्थ उरत नाही. आता ही माणसं काय करणार आहेत? असं राज ठाकरे म्हणाले.


सुशोभीकरण की डान्सबार?


महाराष्ट्राच्या राजकारणाचा बकालपणा झाला आहे. जो चिखल झाला आहे, त्याचं काय? राजकारण्यांकडून व्हिजन घेण्याऐवजी त्यांना व्हिजन देण्याची गरज आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली काय केलंय कळत नाही. मुंबईत खांबावर लाईट लावले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी मुंबई आहे की डान्सबार कळत नाही, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.  


रस्ते कुठे आहेत? 


"शिक्षणाचे तेच झाले, तेच वैद्यकीय परिस्थितीचे, सगळ्याचा विचका झाला आहे. त्या सगळ्या गोष्टींचा लोड हा शहरांवर येतो आणि शहरांवर आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त पैसे खर्च आता मेट्रो बांधले जातात आणि आपण बेसुमार फक्त खर्च करतो. महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये, बाकीच्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती असेल. कदाचित इतर शहरांमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये जाऊ शकत नाही असे रस्ते आहेत. आपण या गोष्टीचा विचार करत नाही आहोत एखादी गाडी घेतली तर गाडी पार्क कुठे होणार आहे याचा विचार करत नाही. टू व्हीलर विकल्या जात आहेत, फोर व्हीलर विकल्या जातात, कुठे पार्क केले जातात माहिती नाही. सरकार सरकारच्या पद्धतीने काम करतंय मग सरकारला काय वाटते हेच ठरत नाही," असं राज ठाकरे म्हणाले.


आम्हाला खाली बसवा


रोजगाराचे प्रश्न कसे सुटले पाहिजे याच्यासाठी प्रयत्न हवे आहेत. खरंच सांगतो तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाची माणसं तुम्ही इथे बोलवा आम्हाला सगळ्यांना खाली बसवा आणि त्याला बोलायला लावा, असं राज ठाकरेंनी नमूद केलं. 


धोरणे बदलू नयेत 


मी काल विधानभवनात कार्यक्रमाला गेलो होतो आणि या ठिकाणी गंमत चालू आहे, मजा चालू आहे असंच वाटलं. लोकांचे प्रश्न आहेत तिकडेच आहेत, पोलिसांचे प्रश्न आहेत तिथेच आहेत. परदेशात अभ्यासगट पाठवून तिथला अभ्यास करुन अशी काही व्हिजन ठरवली पाहिजे की उद्या सरकार कोणाचे येऊ दे उद्या कोणत्याही धोरणाचाा बदल होणार नाही.


ब्लू प्रिंटबद्दल राज ठाकरे काय म्हणाले...


तुमचं ब्लू प्रिंट पब्लिश करुन आता जवळपास आठ-नऊ वर्ष झाले, अशी कोणती गोष्ट तुम्हाला दिसते आहे यावर राज ठाकरे म्हणाले की, "पक्ष स्थापनेच्या वेळी पहिल्यांदा माझ्या ब्लू प्रिंटबद्दल बोललो होतो. 2006-2007 मध्ये आम्ही ती सर्वांसमोर आणली. त्यानंतर महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी याबाबत मला विचारलं नाही.  प्रलंबित प्रश्न आहेत. वर्षानुवर्षाचे प्रश्न आहेत. या प्रश्नांना कुठेतरी फुल स्टॉप लागला पाहिजे, असं मला वाटतं.


13 आमदार जुगारातून आले होते का?


तुमच्या सभांना गर्दी होते पण निवडणुकीमध्ये ते का दिसत नाही याबात तुमचं काय मत आहे, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, आपण प्रश्न विचारला होता की तुमच्या सभांना गर्दी होते आणि मग तुम्हाला मत का मिळत नाही. असं वाटतं 2009 ला माझे जेव्हा तेरा आमदार निवडून आले होत ते काय जुगारातून आले होते का? याच जनतेने मतदान केलं होतं. त्याच्यावर मला असं वाटतं की 13 आमदार निवडून आले होते आणि जवळपास 40 ठिकाणी आम्ही दोन नंबरला होतो. त्यामुळे त्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होत नाही असं नाही.


या सगळ्या गोष्टी तुमच्या शब्दात राज्यकर्त्यांच्या आणि राजकारणाच्या समोर मला असं वाटतं. विचारणं आवश्यक आहे त्यांच्याकडे याची उत्तरे घेणे आवश्यक आहे आणि त्यांना एक टाईम पूर्ण कधी करणार ते सांगा ही जर गोष्ट झाली खूप महत्त्व प्राप्त आहे. जरा मी काही कठोर बोललो असेल तर माफ करा..


VIDEO : Raj Thackeray Majha Vision:सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबईचा डान्सबार करुन टाकला, राज ठाकरेंचा हल्ला



महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी नेत्यांचं व्हिजन


महाराष्ट्रात (Maharashtra News) सध्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांचं संयुक्त सरकार आहे. मात्र, असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यानं पाहिलेलं अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा अद्याप थंडावलेल्या नाहीत. अशा तोफांचा सामना करतानाच राज्याच्या विकासात कसूर न करता राजकीय लढाई लढत राहणं हा समतोल सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही करावा लागत आहे. अशात पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राज्यातल्या सद्यस्थितीबाबत काय वाटतंय. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रगतीची दिशा कशी असेल. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी या नेत्यांचं व्हिजन काय असेल याबद्दल या सर्व नेत्यांशी आज दिवसभर आम्ही दिलखुलास संवाद साधणार आहोत.