Bachchu Kadu On Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रखडला असल्याने, इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. तर अनेकांकडून उघडपणे याबाबत बोलले जात आहे. दरम्यान माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी देखील पुन्हा एकदा मंत्रिपदाची अपेक्षा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. मंत्रिपदासाठी अपेक्षा कायम असून दिव्यांग मंत्रालय मिळाल्यास मलमपट्टी अधिक जोमाने करता येईल, असे बच्चू कडू म्हणाले आहे. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीनिमित्ताने प्रहार व मेस्टाचे उमेदवार डॉ. संजय तायडे पाटील यांच्या प्रचारासाठी बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली.


यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, दिव्यांग मंत्रालयाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षापासून बोलत होतो, परंतु मंत्रालय झाले नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या सहा महिन्यात मंत्रालय स्थापन केले, दिव्यांग मंत्रालयासाठी 20 वर्षापासून संघर्ष केला. अनेक गुन्हे दाखल झालेत. दिव्यांग मंत्रालय झाले याच आनंदात मंत्रीपद विसरलो मात्र, अपेक्षा कायम असून दिव्यांग मंत्रालय मिळाल्यास मलमपट्टी अधिक जोमाने करता येईल, असे मत माजी मंत्री प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चु कडू यांनी व्यक्त केले.


उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर टीका


उद्धव ठाकरेंच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये झालेल्या युतीबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, राजकीयदृष्ट्या केलेली युती, आघाडी टिकत नसते, असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लगावला. तर शिक्षक मतदार संघ निवडणूकीत भाजप बरोबर मैत्रीपुर्ण लढत असल्याचे त्यांनी नमूद केले. 


मंत्रीमंडळ विस्तार कधी? 


राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकराने काही मोजक्या नेत्यांना सोबत घेऊन पहिला मंत्रीमंडळ विस्तार केला होता. विशेष म्हणजे यावेळी इच्छुक असलेल्या अनेक आमदारांना दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारत संधी देण्याचे आश्वासन देखील देण्यात आले होते. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागला नाही.  तर 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा दावा शिरसाट यांनी केला होता, पण त्यांचाही मुहूर्त हुकला आहे. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढत चालली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sanjay Shirsat: 'तर त्यांच्या थोबाडीत मारली पाहिजे'; संजय शिरसाटांचे वक्तव्य