Majha Maharashtra Majha Vision 2024 LIVE: मुंबई : एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आगामी काळात महाराष्ट्रासाठीचं व्हिजन मांडलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या निवडणूक लढवण्याच्या आव्हानाबाबत विचारलं. एबीपी माझाचा कार्यक्रम 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन'मध्ये बोलताना पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी अनुल्लेखानं आदित्य ठाकरेंवर सडकून टिका केली. 


सातत्यानं आदित्य ठाकरे तुम्हाला चॅलेंज करत आहेत. तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो, याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "खरं म्हणजे मला खूप मोठे महाराष्ट्राचे काम आहे, एकच मतदारसंघ माझ्यासाठी महत्त्वाचा नाही.  लोक ठरवतील येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये कोण कुठे उभा राहतो आणि कोण कुठे जिंकून येतो, त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणे योग्य वाटत नाही, उचित वाटत नाही, त्यामध्ये वेळ मला वाया घालवायची इच्छा नाही." 


शेती आणि दुष्काळग्रस्त भागासाठी मुख्यमंत्र्यांचं व्हिजन काय?


जे दुष्काळग्रस्त भाग आहेत तिकडे पाणी कसे नेता येईल हे आम्ही निर्णय घेतले. मराठवाडा  वॉटर ग्रीड बासणात गेला होता,बंद केला होता त्याला आम्ही ओपन केलं. जलयुक्त शिवार योजना बंद होती, ती आम्ही सुरू केली. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल कसे होतील यासाठी आम्ही काम केलं, आज तुम्हाला मी सांगतो अडीच वर्षाच्या पूर्वीच्या काळामध्ये आणि आमच्या दीड वर्षाच्या काळात 120 प्रकल्प सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली. 12 लाख हेक्टर जमीन सिंचना खाली येणार आहे, ते शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'ला राजकीय नेत्यांची मांदियाळी


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision 2024) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांच्यासह राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद साधला जाणार आहे. आज दिवसभर एबीपी माझावर 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे, एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती असणार आहे.  


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डलवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' लाईव्ह पाहा :