मुंबई: राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानपेटीत बंद झालं आहे. त्यामुळे, आता कार्यकर्त्यांपासून सर्वांनाच 4 जूनच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांकडून सातत्याने 40 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही गतनिवडणुकीतील विजयाएवढ्याच जागा महायुती जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी महायुतीच्या मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वेगळाच आकडा सांगितला आहे. महाराष्ट्रात काँटे की टक्कर असल्याचेही आठवलेंनी म्हटले. त्यामुळे, महायुतीचं टेन्शन वाढलं,असेच म्हणता येईल. 


महाराष्ट्रातील यंदाच्या लोकसभा निवडणुकांचा अंदाज बांधणं सर्वांनाच कठीण बनलं आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळतील, याचाही योग्य अंदाज बांधणे अडचणीचं ठरत आहे. पण, दोन्ही आघाड्यातील नेते आपणच सर्वाधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करत आहेत. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्यामुळे, देशाचं लक्ष महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतराकडे लागले आहे. त्यात, आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निकालाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


राजकीय रणधुमाळीत सध्या निवडणूक निकालांवर अनेक मतदारसंघात पैजा लागत आहेत. तर, राजकीय नेतेही आपल्या अनुभवाच्या आणि विश्लेषणाच्या आधारे कोणाला किती जागा मिळणार याचे भाकीत सांगत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं राजकीय गणित मांडलं आहे. महाराष्ट्रात यंदा काँटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. मला वाटते महाराष्ट्रात 35 ते 40 जागा महायुतीच्या निवडून येतील, असे रामदास आठवले यांनी म्हटले. विशेष म्हणजे कालच रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी महायुती महाराष्ट्रात 42 जिंकेला असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. काळ्या दगडावरची पांढरी रेष.. असे म्हणत जानकरांनी बीड, परभणी आणि बारामतीच्या जागांविषयी भाकीत केलं होतं. मात्र, आता त्यांच्याच महायुतीतील पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी 35 ते 40 जागा येतील असा अंदाज व्यक्त केल्याने महायुतीचं टेन्शन वाढलं आहे, असेच म्हणता येईल. 




4 जून रोजीच कळणार


महाराष्ट्रात 48 जागा असून महायुती व महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही आघाड्यांमध्ये तीन-तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक वेगळ्याच वळणावर गेली आहे. त्यातच , मराठा आरक्षणाचा मुद्दाही यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे. त्यामुळे, महायुती गतनिवडणुकीतील जागा राखणार की महाविकास आघाडीला अधिक जागांवर यश मिळणारे हे 4 जून रोजीच कळणार आहे. 


हेही वाचा


बारामतीत सुनेत्रा पवार, बीडमध्ये पंकजा मुंडे, परभणीतून मी जिंकणार, काळ्या दगडावरील पांढरी रेष; महादेव जानकरांनी सांगितला महायुतीचा आकडा