पुणे: गेल्या चार दिवसांपासून राज्यात प्रचंड चर्चेत असणाऱ्या पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे एकच गदारोळ उडाला आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाला यांच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत पोर्शे कार (Pune Porsche Car) चालवताना दोघांना चिरडले होते. यानंतर संबंधित धनिकपुत्रावर कठोर कारवाईची अपेक्षा होती. मात्र, पोलीसांकडून त्याला मिळालेली विशेष वागणूक आणि बालहक्क न्यायालयाने 300 शब्दांचा निबंध लिहण्याची दिलेली शिक्षा यावरुन पुण्यातील जनमत प्रक्षुब्ध झाले होते. याप्रकरणात टीकेची प्रचंड झोड उठल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात येऊन सूत्रं हाती घ्यावी लागली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुणे पोलीस आयुक्तांना फोन करुन याप्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, बालहक्क न्यायालयाने अल्पवयीन मुलाला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात तर विशाल अग्रवाल याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरु असताना पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांचा अलिप्तपणा आणि अनुपस्थितीची चर्चेचा विषय ठरत आहे.


अजित पवार यांनी अपघातानंतर पुणे पोलीस आयुक्तांना फोन करुन सूचना दिल्या होत्या. मात्र, एरवी कामाच्या झपाट्यासाठी आणि प्रशासनावर वचक ठेवून असणारे नेते म्हणून ओळख असलेले अजितदादा पवार यांनी पुण्यात प्रत्यक्ष फिल्डवर येऊन सूत्रे हातात का घेतली नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे  उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यावर रुसलेत का असा प्रश्न विचारला जातोय.  कारण कल्याणी नगरमधील अपघातानंतर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजितदादा न पुण्यात आले न त्यांनी या सर्व प्रकरणाबाबत अद्याप कोणती प्रतिक्रिया दिलीय.  एरवी एखादी घटना घडली की तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन प्रशासनातील अधिकार्यांना सुचना देणारे अजित दादा गेल्या चार दिवसांत पुण्यात फिरकलेले नाहीत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन पोलिस अधिकार्यांना तपासाबाबत सुचना दिल्या.  मात्र पालकमंत्री असलेले अजितदादा मुंबईतच बसून लिहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यात आजारपणातून सावरत बारामती मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला होता. प्रचंड झपाट्याने काम करणारा नेता म्हणून अजित पवारांची ओळख आहे. परंतु, पुणे अपघातानंतर निर्माण झालेला जनक्षोभ आणि संवेदनशील परिस्थिती पाहता पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी पुण्यात ठाण मांडून काम करणे अपेक्षित होते. परंतु, पुण्यात येणे सोडाच पण अजित पवार यांनी एका फोन कॉलच्या पलीकडे पुणे अपघात प्रकरणात विशेष स्वारस्य दाखवलेले नाही. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजितदादा नाराज असल्यामुळे अलिप्त राहत आहेत का? त्यांच्या या नाराजीचे कारण काय?, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. 


आणखी वाचा


Pune Accident : मध्यरात्री किती लोकांसाठी पोलीस ठाण्यात गेलात? दानवेंचे सुनील टिंगरे आणि अजितदादांना 3 प्रश्न!