Nashik Water Shortage : एकीकडे नाशिककर असह्य उकाड्याने हैराण आहेत. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईची (Water Scarcity) गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) गाव-खेड्यांवर घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती पाहायला मिळतेय.


इगतपुरी तालुक्यातील निशाणवाडी (Nishanwadi) परिसरात धरण आहे. या धरणाच्या परिसरात बारावाडी खेडे आहेत. धरणातील पाणी दूषित असल्यामुळे ते पिण्यासाठी वापरता येत नाही. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतेय. मात्र इतर ठिकाणाच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरींनी देखील तळ गाठलाय. तेथील महिला पाण्याच्या शोधात मैलोमैल पायपीट करत धरणाच्या शेजारी छोटे खड्डे करून पाझरलेले पाणी जमा करून तहान भागवताना पाहायला मिळत आहेत. 


धरण उशाला अन् कोरड घशाला


दिवसदिवस अंडाभर पाण्यासाठी बसून राहावे लागते. पाण्यामुळे रोजंदारीवर पण जाता येत नाही. धरणाच्या शेजारी खड्डे खोदून पाणी पाझरून घ्याव लागत आहे. दिवसभरात दोन-तीन हांडे भरेपर्यंत अंधार पडून जातो. लहान मुलींना घेऊन घरात प्यायचे पाणी मिळवतो. धरणातील पाणी वास मारत आहे. म्हणून पाझरून पाणी भरले जाते.  आमचं धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. गावातील सरपंच पण पाण्याचा प्रश्न सोडवत नाही. हंडा मोर्चा काढून पण ग्रामपंचायत पाणी सोडत नाही. बारा गाव मिळून चार पाण्याचे टँकर देतात, अशा समस्या यावेळी महिलांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. 


शहरात शनिवारी पाणीबाणी 


दरम्यान, नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा होणार नाही. तर रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु राहणार आहे.  पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन नाशिक मनपाकडून करण्यात आले आहे. पुरवठा वाहिन्यांची दुरुस्ती, व्हॉल बदलणे, व्हॉलची दुरुस्ती कामे असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीची कामे असल्याने महापालिका हद्दीत राहणार पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याची माहिती नाशिक मनपाने दिली आहे. 


नाशिक जिल्ह्यात 273 गावे व 655 वाड्यांमध्ये पाणीटंचाई


जिल्ह्यात उष्णतेची लाट आलेली असताना झपाट्याने पाण्याचा साठा घटत चालला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने गावोगावी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने एकाच वेळी पाण्याची मागणीही वाढू लागली. नाशिक जिल्ह्यातील 273 गावे व 655 वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाच लाख 38 हजार 763 नागरिक व दोन लाख जनावरांची तहान 286 टँकरद्वारे भागविली जात आहे.जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत भविष्यात पाण्याची आणखी भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी : नदीत बुडालेल्या व्यक्तीला शोधायला गेलेल्या SDRF पथकाचीच बोट उलटली, तिघांचा मृत्यू


Marathwada Drought : मराठवाड्यात टँकर 600 पार! जायकवाडीत फक्त 23 टक्के पाणीसाठा; विभागातील 399 गावात पाणी टंचाई