मुंबई: राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सगळ्यांच्या नजरा महायुती सरकारचे मंत्रिमंडळ आणि त्यामधील खातेवाटपाकडे लागणार आहे. महायुती सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे गृहखात्यावर अडून बसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासही फारसे उत्सुक नव्हते, अशी चर्चा होती. हा शपथविधी पार पडल्यानंतरही महायुती सरकारच्या खातेवाटपाबाबत निश्चित अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोणती खाती मिळणार, याबाबत अद्याप संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेच रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर भेटले. या दोघांमधील बैठक रात्री उशीरापर्यंत सुरु होती. या बैठकीत गृहमंत्रीपद आणि इतर खात्यांबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. परंतु, अद्यापपर्यंत या बैठकीचा तपशील समोर आलेला नाही. वर्षा बंगल्यावरील या बैठकीत तासभर सुरु असलेल्या खलबतांमध्ये मंत्रिमंडळ आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याचे समजते. आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज महायुती सरकारकडून सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. यानंतर राज्य सरकार खऱ्या अर्थाने अस्तित्ताव येईल.


दरम्यान, 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल, असे प्रमुख नेत्यांकडून सांगितले जात आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार एकाच टप्प्यात पार पडणार की सुरुवातीला मोजक्याच मंत्र्यांना शपथ देऊन महायुती सरकार हिवाळी अधिवेशनाला सामोरे जाणार, हे पाहावे लागेल. हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मंत्र्यांची खाती निश्चित होणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे आगामी 10 दिवस हे महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. याच काळात राज्याचे गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळणार की नाही, याचा फैसला होईल. तसेच शिंदे गटाच्या वाट्याला नेमकी कोणती खाती येणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


शिवसेनेला 13 ते 14 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता


सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला महायुती सरकारमध्ये 13 ते 14 मंत्रिपदं मिळू शकतात. एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपापूर्वी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागवल्याची माहिती आहे. त्यानुसार संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या दोन मंत्र्यांना खराब कामगिरीमुळे डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


आणखी वाचा


गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही


देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची मागणी मान्य करणार?, राज्याचं लक्ष; भास्कर जाधव म्हणाले मुख्यमंत्री सकारात्मक!