Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीत महायुतीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं. त्यामुळे आता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याचा आवाज ऐकायला मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि यासाठीच सध्या विरोधी पक्षातील नेतेमंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाठी घेत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. 


महाविकास आघाडीचे हे बडे नेते आज  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आणि या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव ठेवला तो विरोधी पक्षनेतेपदाचा...


उद्या विधानसभा अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. पण त्याआधी महाविकाआस आघाडीच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीनं अर्ज भरला नाही. पण त्याबदल्यात विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी या नेत्यांनी प्रस्ताव ठेवला.


भास्कर जाधव म्हणाले, 1999 पासून ची परंपरा होती   सत्ताधाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्षपदस्थ तर विरोधकांकडे विधानसभेचे उपाध्यक्ष पद... भाजप आणि शिवसेनेच्या काही चुकांमुळे ही परंपरा खंडित झाली होती.  त्यामुळे ही परंपरा पुन्हा सुरू करावी आणि उपाध्यक्ष पद मिळावं  अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर केली.


यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं 230 पेक्षा जास्त जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवलं...त्यामुळे यावेळी विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल की नसेल असा प्रश्न उपस्थित झाला. याचं कारण विरोधकांकडे नसलेलं पुरेसं संख्याबळ...


विरोधी पक्षनेतेपदासाठी नियम काय?
---------------------------------------- 


विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या 10 टक्के आमदार असणं आवश्यक आहे


महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांची एकूण संख्या 288 


त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे किमान 29 आमदारांचं संख्याबळ आवश्यक


विरोधी बाकावरच्या महाविकास आघाडीतील पक्षांपैकी


ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20 


काँग्रेसकडे 15, 
 
तर पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत


आता हे अपुरं संख्याबळ पाहता. नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद कोणत्याही एका पक्षाला मिळणार नाही...पण विरोधी पक्षनेता निवडीसाठी संख्याबळ महत्वाचं नाही हा मुद्दा..  मुख्यमंत्र्यांना पटवून दिल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलंय...राज्य चालवण्यासाठी जेवढे सत्ताधारी महत्त्वाचे तेवढेच विरोधक महत्त्वाचे आणि त्यामुळेच विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावं असं आम्ही मुख्यमंत्र्यांना बोललो, असंही जाधव म्हणाले.


दरम्यान विरोधी पक्षनेत्यासंदर्भात राहुल नार्वेकरांनी काय प्रतिक्रिया दिलीय तेही ऐका...


विरोधी पक्षनेता कोण असेल यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असतो, माझ्याकडे गोष्टी आल्या की विचार करुन निर्णय घेऊ.या सगळ्या गाठीभेटींनंतर मुख्यमंत्री आपल्या प्रस्तावांसंदर्भात सकारात्मक असल्याचं विरोधकांनी म्हटलंय...पण खरंच फडणवीस विरोधकांच्या प्रस्तावाला मान्यता देतील का? सरकारला जाब विचारणारा विरोधी पक्षनेत्याच्या आवाज विधानसभेत ऐकायला मिळणार का? की ज्याप्रमाणे 10 वर्षे विरोधी पक्षनेत्याशिवाय लोकसभेचं काम चाललं तसंच महाराष्ट्र विधानसभेचं होणार? या प्रश्नांच्या उत्तराची महाराष्ट्राला नक्कीच प्रतिक्षा आहे..


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Maharashtra Politics : हिंमत असेल तर राजीनामा द्या, ईव्हीएमवर शंका घेणाऱ्या ठाकरेंच्या आमदाराला शिंदेंच्या पराभूत महिला उमेदवाराचं आव्हान