मुंबई: कुख्यात गुंड अरुण गवळीची (Arun Gawli) मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने तर ही सुटका झाली नाही ना याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दक्षिण मुंबईमध्ये (South Mumbai Lok Sabha Election) असलेल्या लालबाग ते माजगाव परिसरातील मतांची बेरीज करण्यासाठीच महायुतीने गवळीला तुरुंगाबाहेर काढल्याची चर्चा आता रंगतेय. 


शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची 2 मार्च 2007 रोजी त्यांच्या राहत्या घरी घाटकोपरला अरुण गवळीच्या गुंडांनी हत्या केली आणि त्यानंतर तब्बल 1 महिन्यानंतर गवळीला या प्रकरणी अटक करण्यात आली होती. याच केसच्या सुनावणीत पुढे गवळीला दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.


दक्षिण मुंबईत मोठा मतदार गवळीच्या मागे


एकीकडे अरुण गवळीच्या सुटकेचा आदेश समोर आला आणि दुसरीकडे दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील चर्चेत आली आहे. कारण अरुण गवळीच्या सुटकेमागे दक्षिण मुंबईतील मतदार सोबत घेण्यासाठीचा तर महायुतीकडून प्रयत्न होत नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण अरुण गवळी यांचा लालबाग, परळ, भायखळा, करीरोड, दगडी चाळ, सातरस्ता, माजगाव या भागात प्रभाव आहे. 


गवळीच्या मतांवर डोळा ठेऊन सुटका? 


सन 2004 साली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरुण गवळीने आपल्या अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेच्या मोहन रावले यांच्याविरोधात त्यांना तब्बल 92 हजार मते मिळाली होती. 


महत्त्वाची बाब म्हणजे त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून गवळीचे भाचे सचिन अहिर रिंगणात होते. त्यावेळी निवडून आलेल्या मोहन रावले यांच्या मतांच्या आकड्यापेक्षा सचिन अहिर आणि अरुण गवळी यांना मिळालेल्या मतांचा आकडा मोठा होता. हीच बाब लक्षात महायुतीने तर गवळींच्या सुटकेचं जाळ टाकलं नाही ना अशी चर्चा सुरु आहे. 


शासन निर्णयाचा दाखला देण्यात येतोय 


एकीकडे निवडणुकीचा अँगल जरी गवळींच्या सुटकेच्या निमित्ताने चर्चेत असला तरी दुसरीकडे शासनाच्यावतीने 2006च्या शासन निर्णयाचा संदर्भ पुढे करण्यात आला आहे. वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, अर्धी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेतून सूट दिली जाते. त्यानुसारच अरुण गवळीच्या शिक्षेच्या अर्जांचा विचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.


सध्या महायुतीला दक्षिण मुंबईतून लढण्यासाठी कणखर उमेदवार मिळत नाही. अशावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू डाँन म्हणून उल्लेख केलेला अरुण गवळीचा फायदा महायुतीला किती होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण उद्वव ठाकरे यांच्याकडे अजूनही मराठी आणि मुस्लिम मतदारांचे पॉकेट कायम आहे. तसेच अरविंद सावंत यांच्यासारखा तगडा उमेदवार देखील आहे. 


ही बातमी वाचा :