मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हेच कल्याण मतदारसंघाचे उमेदवार असतील अशी घोषणा केली आहे. आम्ही महायुतीतील (Mahayuti) सर्व घटकपक्ष त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहोत, असं ते म्हणालेत. श्रीकांत शिंदे लोकसभेची निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. कल्याणमध्ये आता श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) उमेदवार वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांच्यात सामना होणार आहे. याच दरेकरांनी आता श्रीकांत शिंदेवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. श्रीकांत शिंदे कमळ की धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. 


देवेंद्र फडणवीसांकडून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा


गेल्या अनेक दिवसांपासून कल्याणच्या मतदारसंघावरून महायुतीमध्ये धुसफूस चालू होती. या जागेवर महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी दावा सांगितला होता. भाजपचे आमदार गणपतराव गायकवाड यांनी तर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला थेट विरोध केला होता. शिंदे यांना तिकीट दिले तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका गायकवाड यांच्या समर्थकांनी घेतली होती. याबाबत विदर्भाच्या दौऱ्यावर असताना फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे कल्याणचे उमेदवार असतील, असं फडणीस स्पष्टपणे म्हणाले आहेत. फडणवीसांच्या या घोषणेनंतर आता ठाणे, कल्याणमधील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. 


श्रीकांत शिंदे यांच्यावर एवढी नामुष्की ओढावली का?


उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या जागेवर वैशाली दरेकर यांना तिकीट दिले आहे. त्या कल्याणमधील महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील. दरम्यान श्रीकांत शिंदे यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर दरेकर यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. श्रीकांत उमेदवार यांना तिकीट देण्यात आल्यामुळे मला आनंद झाला आहे. त्यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. म्हणूनच मला शंका आहे की त्यांचं निवडणूक चिन्ह कोणतं असेल. ते कमळ चिन्हावर लढणार आहेत की धन्युष्यबाण चिन्हावर? यासाठीच त्यांनी अट्टहास केला होता का? देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करावी, एवढी त्यांच्यावर नामुष्की ओढालवी आहे का? अशी खोचक टीका टीका वैशाली दरेकर यांनी केली.  


दरम्यान, फडणवीसांनी उमेदवारीची घोषणा करताच श्रीकांत शिंदे यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांसाठी कल्याणची जागा प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे या जागेवर कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.