Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घटनांना वेग आला आहे. १९८९ ते २०१९ या तीन दशकांमध्ये १९९८ च्या निवडणूकीचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी शिवसेना भाजप युतीचा खासदार शहरातून निवडून आल्याचं दिसून येतं. मात्र, मागील दोन निवडणूकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदारांचा कौल बदलतानाचे चित्र आहे.


राज्यात लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेसाठी सर्वपक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असताना मराठवाड्यातील मतदारसंघांकडे महायुतीसह, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचे लक्ष आहे. दरम्यान मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणत्या विधानसभा मतदारसंघाचे पक्षीय बलाबल कसे? कोणत्या उमेदवारांमध्ये लढत होणार?


पक्षीय बलाबल कसे?


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ. यातील सिल्लोड, औरंगाबाद मध्य, पश्चिम, पैठण आणि वैजापूर या पाच मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार. औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची आघाडी. आणि कन्नड विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जागा आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाविरुध्द कोण राहणार?


फुलंब्री मतदारसंघ


छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री मतदारसंघात नव्या खेळाडूंमध्ये लढत होणार आहे. विधानसभेत भाजपचे उमेदवार हरीभाऊ बागडे आता राजस्थानचे राज्यपाल झाल्याने आणि लोकसभेत विजयी होत कल्याण काळे जालन्याचे खासदार झाल्याने यंदा विधानसभेसाठी फुलंब्रीतून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना नवा चेहरा शोधावा लागणार आहे. यासाठी दोन्ही पक्षांनी तयारी सुरु केली असून फुलंब्री मतदारसंघातून दोन्ही पक्षांकडून कोणत्या उमेदवारांमध्ये लढत होणार हा औत्सूक्याचा विषय ठरणार आहे. 


विधानसभेच्या २०१९ च्या निवडणूकीत फुलंब्री मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हरीभाऊ बागडे  १,०६,१९० मतांनी विजयी झाले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे हे उमेदवार होते. 


गंगापूर मतदारसंघ


भाजपचे वर्चस्व असणाऱ्या गंगापूर मतदारसंघात यंदा भाजप विरुद्ध राष्ट्रवारी अशी लढत होणार आहे. २०१९ च्या विधानसभेत प्रशांत बंब यांचा विजय झाले होते.  त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संतोष पाटील उभे होते. आता सध्याचे भाजप आमदार प्रशांत बंब  या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असून गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सतीश चव्हाणांनीही या मतदारसंघाकडे लक्ष वाढवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे २००९ पासून प्रशांत बंब यांचे वर्चस्व असणाऱ्या गंगापूर मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत होण्याची शक्यता आहे.


औरंगाबाद पूर्व मतदारसंघ


औरंगाबाद पूर्व मतदारसंघात २०१९ च्या विधानसभेत भाजपच्या अतूल सावे यांनी एमआयएमच्या डॉ कादरी गफार यांचा पराभव करत विजय मिळवला होता. दरम्यान भाजपचे संजय केणेकर यांनी अतूल सावे यांच्या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केल्याने महायुतीकडून कोणाचे नाव पुढे येणार? अतूल सावेंना पूर्व मतदारसंघ राखता येणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.


पैठण विधानसभा मतदारसंघ


छत्रपती संभाजीनगरमध्ये २०१९ च्या निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाचे संदिपान भूमरे निवडून आले होते. लोकसभा निवडणूकीतही निवडून येत छत्रपती संभाजीनगरमधून भूमरेंना सहकारमंत्री झाले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे तेंव्हाचे उमेदवार दत्तात्रय गोर्डे यांनी निवडणूक लढवली होती. ते आता शिवसेना उद्धव ठाकरे गटात आहेत.


संदिपान भूमरे मंत्री झाल्याने आता शिंदे गटाकडून आगामी विधानसभेसाठी कोणाला पसंती दिली जाईल, हे पाहणं महत्वाचे ठरेल.


औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ


औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट निवडणून आले होते. औरंगाबाद पश्चिममधून विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आले होते. ४० हजार मतांनी भाजपच्या राजू शिंदेंचा पराभव केला होता.


2004 मध्ये शहरात दोनच मतदार संघ होते औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम. २००९ च्या निवडणूकीत  औरंगाबाद मध्य या विधानसभा मतदारसंघाची भर पडली. याच निवडणूकीत शिवसेनेचे संजय शिरसाट पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यामुळे २०२४ च्या विधानसभेत औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात महायुतीची जागा येते की नाही हे महत्वाचे आहे.


औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ


लोकसभा निवडणूकीनंतर औरंगाबाद मध्य मतदारसंघातून शिवसेना इच्छूकांची संख्या वाढली आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जैसवाल निवडून आले होते. या मतदारसंघातून प्रदीप जैसवाल विरुद्ध माजी खासदार इम्तियाज जलील अशा सामना आगामी लोकसभेत पहायला मिळू शकतो. दरम्यान, लोकसभा निवडणूकीनंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार शहरातील मध्य आणि पूर्व भागात इम्तियाज जलील पहिल्या नंबरवर होते. मध्य विधानसभा मतदारसंघांमधून मतदार कोणाच्या पाठीशी राहतात हे पाहणं औत्सूक्याचं ठरणार आहे.


कन्नड विधानसभा मतदारसंघ


छत्रपती संभाजीनगरचा कन्नड विधानसभा मतदारसंघ हा आगामी विधानसभेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा झेंडा या मतदारसंघावर असल्याने शिवसेना शिंदे गट विरुध्द शिवसेना उद्धव ठाकरे गट असाच सामना या मतदारसंघात दिसण्याची शक्यता आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत कन्नड मतदारसंघातून एकमेव ठाकरे गटात राहिलेले आमदार उदयसिंह राजपूत यांचा विजय झाला होता. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव होते. त्यामुळे जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला एकनिष्ठ असणारे आमदार आगामी विधानसभेत बाजी मारतात की शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा या मतदारसंघावर फडकतो? हे महत्वाचे ठरणार आहे.


सिल्लोड विधानसभा मतदारसंघ


फुलंब्री मतदारसंघाप्रमाणेच सिल्लोड मतदारसंघालाही महायुतीला आता नवा चेहरा द्यावा लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून अब्दुल सत्तार विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात प्रभाकर पालोद उभे होते. परंतू, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सत्तार पालकमंत्री झाल्याने आता महायुतीला या मतदारसंघासाठी नवा चेहरा द्यावा लागणार आहे.


वैजापूर विधानसभा मतदारसंघ


शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत यंदा आगामी विधानसभा निवडणूकीत वैजापूर मतदारसंघात दिसू शकते. मागील विधानसभेत वैजापूर मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे रमेश बोरनारे  ९८ हजार १८३ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभय पाटील उभे होते. यापूर्वी २०१४ मध्ये भाऊसाहेब चिकटगावकरांचा विजय झाला होता. त्यामुळे आता आगामी विधानसभेत मविआ विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे गट असा लढा पहायला मिळू शकतो.


हेही वाचा:


विधानसभेची खडाजंगी : 'पाटलां'च्या जिल्ह्यावर वर्चस्व कुणाचं? सांगलीत जयंत पाटील-विश्वजीत कदमांना महायुती कशी भिडणार? आमदारांची यादी