Rashmi Shukla : वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशा चर्चा सुरु झाली आहे. कारण केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांनी काल (18 ऑगस्ट) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे नेते मोहित कंबोजही (Mohit Kamboj) तिथे आले, त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.


महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाली. सध्या त्या हैदराबादमध्ये सीआयएसएफमध्ये कार्यरत आहेत. काल त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर असताना भाजप नेते मोहित कंबोजही तिथे पोहोचले त्यामुळे विरोधकांनी यावरुन टीकास्त्र सोडले.


भाजप नेते मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली याबाबत विचारलेल्या प्रश्नावर  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपरोधिक टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेला सागर बंगला हा वॉशिंग मशिनचे काम करत आहे, असं थोरात म्हणाले. 


रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप काय?


- रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे. 


- फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.


- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. 


- राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे.


रश्मी शुक्ला यांच्यापाठोपाठ भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी पोहोचल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि मी एक पोलीस अधिकारी आहे. त्यामुळे मी फडणवीसांची अधिकृत भेट घेतली. या भेटीचा आणि मोहित कंबोज यांचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया रश्मी शुक्ला यांनी एबीपी माझा दिली.


गेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना रश्मी शुक्ला या फडणवीस यांच्या मर्जीतील पोलीस अधिकारी आहेत अशी त्यांची ओळख होती. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले आहेत त्यामुळे रश्मी शुक्ला महाराष्ट्रात येणार का याची चर्चा सुरु झाली आहे.


Rashmi Shukla Meet Devendra Fadanvis : रश्मी शुक्ला यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट