नागपूरः अलिकडे सोशल मीडियावर एखाद्या घटनेबद्दल विचार मांडल्यावर त्याचे काय परिणाम होतील याचा नेम राहिलेला नाही. यातच राजकीय किंवा धर्म-समाजाबद्दलच्या पोस्टवर सतत वाद होत असतात. यातच नागपूरच्या शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाने केलेल्या पोस्टमुळे त्यांना चक्क धमकीचा पत्रच पाठविण्यात आला आहे. लाल रंगाने लिहीलेल्या या पत्रात 'अब तेरी भी गर्दन उतारी जायेगी' अशी धमकी एका दगडावर कागद गुंडाळून फेकण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शिवसेनेचे उपशहर प्रमुख लॉरेन्स ग्रेगरी यांनी 9 ऑगस्ट रोजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यसंदर्भात फेसबुक वर पोस्ट टाकली होती. त्यात लॉरेन्स ने नुपूर शर्मा प्रकरणानंतर उदयपूर येथे झालेल्या कन्हैयालाल हत्याकांडाचा उल्लेख केला होता. त्यानंतर अज्ञात आरोपीने लॉरेन्स ग्रेगरीच्या घरात दगडावर गुंडाळलेला एक धमकीचा पत्र टाकला. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करत लॉरेन्स ग्रेगरीला सुरक्षा पुरवली आहे.
आरोपीचा अद्याप शोध सुरुच
यापूर्वी नागपूरातील भाजप कार्यकर्ते मनोज सिंह यांनाही फेसबुक वर पोस्ट केल्यानंतर धमकीचे पत्र मिळाले होते. नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भातला गुन्हा दाखल असून अद्यापही पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर वादग्रस्त विषयांना समर्थन देणाऱ्या पोस्ट करणे आणि त्यानंतर अज्ञात आरोपींकडून पोस्ट करण्याला जीवे मारण्याची धमकी मिळणे अशी मालिका सुरूच आहे. मात्र उदयपूर आणि अमरावती मध्ये घडलेल्या दुर्दैवी घटना नंतर पोलिसांनी हे सर्व प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तसेच समाज माध्यमांवर पोस्ट करताना प्रत्येकाने सावध राहण्याची ही तेवढीच गरज असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पहिल्याच दिवशी दमछाक; अजित पवारांची फुल बॅटिंग!
काय होता वाद?
तत्कालीन भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी धार्मिक विद्वेष होईल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य संदर्भात चर्चा सुरू झाली. नुपूर शर्मा यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला समर्थन करणाऱ्या पोस्ट समाज माध्यमांवर टाकल्यामुळे उदयपूर येथे कन्हैयालाल आणि अमरावती येथे उमेश कोल्हे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपींची कसून चौकशी करण्यात येत असून त्यात सतत नवे खुलासे तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे.