Rashmi Shukla Devendra Fadnavis  : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काल, बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेते मोहित कंबोज हेदेखिल फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. फोन टॅपिंग प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 


फोन टॅपिंग प्रकरणात ठाकरे सरकारच्या काळात चौकशी सुरु झाली होती. या फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या प्रकरणाचं पुढं काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.  मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे म्हटले होते. तर, बुधवारी केलेल्या ट्वीटमध्ये या नेत्याची संपत्ती, परदेशातील मालमत्ता आणि प्रेयसीच्या नावाने जमवलेला पैसा आदींचा गौप्यस्फोट करणार असल्याचे म्हटले होते.  या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.


बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप काय?


रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. 


राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. दरम्यान, याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधी फोन टॅपिंग करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. 


संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी 16 मार्च 2022 रोजी रश्मी शुल्का यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. तब्बल दोन तास त्या कुलाबा पोलीस ठाण्यात होत्या. रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. 


पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी 700 पानांचे चार्जशीट दाखल केले आहे. मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्या विरोधात हे चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या या चार्जशीटमध्ये 20 शासकीय अधिकाऱ्यांसह शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जबाब  नोंदवण्यात आले आहेत.