Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए कोर्टात हजर केलं असता त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आज (4 ऑगस्ट) ही कोठडी संपल्याने राऊत यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. अखेर कोर्टाने त्यांची कोठडी वाढवली. संजय राऊत चौकशीत सहकार्य करत नाहीत, असा आरोप ईडीने कोर्टात केला.
संजय राऊतांना
संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली होती, पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलंय, आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा सवालही उपस्थित केला होता. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर ईडीने आज पुन्हा एकदा कोठडी 10 ऑगस्टपर्यंत वाढवून मागितली. परंतु संजय राऊत यांचे वकील अॅड. मनोज मोहिते जिरह यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला. परंतु कोर्टाने त्यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवली
संजय राऊत यांच्या कोठडीबाबत कोर्टातील युक्तिवाद
संजय राऊत : कस्टडीच्या ठिकाणी कोंदट वातावरणामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. मला इतर अडचणी नाहीत पण जिथे ठेवलंय तिथे एकच पंखा आहे
कोर्ट : ही गंभीर बाब आहे, यावर तुम्ही (ईडी) काय बोलणार?
ईडी : आम्ही त्यांना एसीमध्ये ठेवल आहे
कोर्ट : राऊत तुम्हाला एसीमध्ये ठेवलं आहे का?
संजय राऊत : मी पाहिलं नाही फक्त फॅन आहे
कोर्ट : वेंटिलेशन उपलब्ध असलेली दुसरी खोली आहे का?
संजय राऊत : मी एसी वापरत नाही कारण श्वास घ्यायला त्रास होतो
ईडीच्या वकिलांचा युक्तिवाद
ईडीचे वकील वेणेगावकर : आम्हाला काही कागदपत्रे मिळाली असून त्यात अनेक खुलासे झाले आहेत. यात मनी ट्रेलची माहिती मिळाली आहे जी अनेकांना देण्यात आली आहे, ती देखील रोख स्वरुपात. तपासादरम्यान आणखी 1.17 कोटी रुपये समोर आले आहेत. यापूर्वी 1.06 कोटींची माहिती मिळाली होती.
ईडीचे वकील वेणेगावकर : या प्रकरणात आम्हाला काही पुरावे सापडलेत ज्यातून यात मनी लाँड्रिंग झाल्याचं दिसत आहे. 112 कोटी प्रवीण राऊत यांनी अनेकांच्या अकाऊंटमध्ये फिरवले आहेत. त्यामुळे यात सखोल चौकशीची गरज आहे.
ईडीचे वकील वेणेगावकर : कागदपत्रात अनेक महत्त्वाची माहिती सापडली आहे. आम्ही बँक खाते तपासले ज्यामध्ये आम्हाला काही व्यवहारांची माहिती मिळाली आहे जी असंबंधित लोकांना पाठवली गेली आहे ती देखील आरोपीच्या म्हणजेच संजय राऊतच्या पत्नीच्या खात्यातून. संजय राऊत याबाबत माहिती देत नाहीत. कोणाचे पैसे गेले किंवा आले, त्यांना बोलावून चौकशीसाठी बोलावले आहे.
ईडीचे वकील वेणेगावकर : अशा एका व्यक्तीला आम्ही चौकशीला बोलावले आहे ज्या व्यक्तीचे नाव आम्ही इथे घेऊ शकत नाही त्या व्यक्तीला आणि राऊतांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे.
ईडीचे वकील वेणेगावकर : संजय राऊत आधीच्या चौकशीत ज्या आर्थिक व्यवहारांबाबत नकार देत होते त्याची कागदपत्रे त्यांच्या घरात झडती दरम्यान सापडली आहेत. काही अशी कागदपत्रे सापडलेत ज्यातून असं दिसतंय की संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यातून खूप मोठ्या रकमेचे ट्रान्झॅक्शन झाले आहेत. जवळपास 1 कोटी 8 लाख रुपये नुकतेच पाठवण्यात आले आहेत.
संजय राऊत यांच्या वकिलांचा युक्तिवाद
अॅड. मनोज मोहिते जिरह, संजय राऊत यांचे वकील : तपासात नवीन काहीही समोर आलेलं नाही. ईडीने मागच्या वेळीही असंच म्हटलं होतं.
अॅड. मनोज मोहिते जिरह, संजय राऊत यांचे वकील : सर्व काही राजकीय हेतून प्रेरित आहे. काही लोकांना पकडलं जात, काहींना सोडलं जातं. मी इतकेच म्हणेन की ईडी कोठडीची गरज नाही.
कोर्टात जाण्यापूर्वी संजय राऊत आणि ईडी अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची
संजय राऊत ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर गाडीत बसत असताना एक घटना घडली. संजय राऊत आणि ईडी अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. संजय राऊत कोर्टात जाताना त्यांची बंधू सुनील राऊत, जावई मल्हार नार्वेकर आणि काही शिवसैनिक त्यांना भेटायला आले होते. गाडीत बसण्यापूर्वी संजय राऊत या सगळ्यांशी बोलत होते, हातमिळवणी करत होते. परंतु त्यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं. "हे योग्य नाही, तुम्ही सध्या ईडी कोठडीत आहात आणि आपल्याला कोर्टात जाण्यासाठी निघायचं आहे," असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यावरुन संजय राऊत आणि ईडी अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत होते?
अंमलबजावणी संचालनालयाने 31 जुलै सकाळी संजय राऊत यांच्या भांडुपमधील घरावर छाप टाकले. नऊ तासांच्या छापा आणि चौकशीनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन कार्यालयात नेलं. तिथे काही तास चौकशी केल्यानंतर रात्री अटक केली होती. या प्रकरणी ईडीने असा दावा केला होता की, संजय राऊत यांचा संबंध असून प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला. प्रवीण राऊत फक्त मोहरा होते, खरे सूत्रधार संजय राऊत हेच होते, आमच्याकडे याचे पुरावे आहेत. तसेच राऊतांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. संजय राऊत यांना जर जामीन मिळाला तर ते पुन्हा धमकाविण्याचं किंवा त्यापुढे जाऊन कृत्य करु शकतात, तसेच राऊत यांचे परदेश दौरे बिझनेसमन आणि विविध लोकांकडून पुरस्कृत केले जातात, याचं नेमकं कारण काय? असा सवाल करत प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत होते, ते कशासाठी? असा सवालही ईडीने उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांच्यावर ईडीने कोणते आरोप केले?
संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असं ईडीने न्यायालयात सांगितलं. मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले. येस बँक घोटाळा प्रकरणी वाधवान बंधू यांच्यासोबत प्रविण राऊत यांचं नाव आलं असून या प्रकरणीही संजय राऊत यांची भविष्यात ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबंधित बातम्या