मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाली, त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या, आरोप-प्रत्यारोप झाले. पण संजय राऊत यांच्या अटकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. गेल्या 48 तासांमध्ये शरद पवार यांनी ना कोणतेही ट्वीट केलं ना कोणती पोस्ट वा प्रतिक्रिया. संजय राऊत यांच्यावर पहिल्यांदा कारवाई झाली त्यावेळी थेट पंतप्रधानींची भेट घेऊन तक्रार करणारे  शरद पवार राऊतांच्या अटकेनंतर मात्र मौनात गेले आहेत याचं अनेकांना आश्चर्य वाटतंय. 


राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल
संजय राऊत यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर राज ठाकरेंचा जुना एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये राज ठाकरे म्हणाले होते की, " महाराष्ट्रात एकेकजण अटकेत गेले की शरद पवार पंतप्रधानांची भेट घेतात आणि पुढचा नंबर लावतात. पवार साहेब खुश झाले की भीती वाटायला लागते. आज शरद पवार संजय राऊत यांच्यावर खुश आहेत, पण त्यांना कधी टांगलेलं दिसेल कळणार नाही."


संजय राऊतांच्या अटकेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की, संजय राऊतांवर अशी कारवाई होणार याची कुणकुण आधीच होती. त्यामुळे यात केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करायचं हे आम्ही पहिल्या दिवसांपासून ठरवलं होतं. 


संजय राऊत यांच्या घरावर जप्ती आणल्यानंतर शरद पवार थेट पंतप्रधान मोदींच्या केबिनमध्ये पोहोचले होते. मोदींसोबत ईडीच्या कारवायांबाबत चर्चा केल्याचा दावा खुद्द शरद पवारांनीच केला होता.


शरद पवार जे म्हणतात त्याच्या नेमकं उलटं होतं अशी अख्यायिका महाराष्ट्राच्या राजकारणात 80 च्या दशकापासून सुरु आहे. आता पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यानं पुन्हा याचीच चर्चा सुरु झाली. संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर शरद पवार काही प्रतिक्रिया देणार की मौनच धारण करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण शरद पवारांचं मौनही देशाच्या राजकारणात बोलकं ठरतं.