मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना चार दिवसांची ईडीची कस्टडी सुनावण्यात आली. या प्रकरणी न्यायालयात आज सुनावणी पार पडली असून गोरेगाव मधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने न्यायालयात केला.
संजय राऊत यांच्यावर ईडीने कोणते आरोप केले?
1. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा थेट हात
प्रविण राऊत हे नुसता फ्रन्ट मॅन असून संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला.
2. संजय राऊत यांना 1 कोटी 6 लाख रुपये
प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले.त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमिन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे.
3. प्रविण राऊत फक्त नावालाच, खरे आरोपी संजय राऊत
या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असं ईडीने न्यायालयात सांगितलं. मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले
4. संजय राऊतांनी साक्षीदारांना धमकावलं
या प्रकरणात संजय राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीने न्यायालयाला सांगितलं. संजय राऊत यांना जर सोडलं तर ते पुन्हा तशा प्रकारचं कृत्य करु शकतात, त्यामुळे त्यांना आठ दिवसांची रिमांड देण्यात यावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.
येस बँक घोटाळा प्रकरणी वाधवान बंधू यांच्यासोबत प्रविण राऊत यांचं नाव आलं असून या प्रकरणीही संजय राऊत यांची भविष्यात ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.