Ajit Pawar News : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे तातडीने नागपुरातून (Nagpur) मुंबईला (Mumbai) येणार असल्याची माहिती मिळत आहे. पण शिंदे फडणवीस सरकारने अजित पवार यांच्या तातडीच्या प्रवासासाठी सरकारी विमान उपलब्ध करुन दिल्याची माहिती समोर आली आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून सुटका होणार आहे. त्यांची भेट घेण्यासाठी अजित पवार मुंबईत येण्याची शक्यता आहे. सध्या अजित पवार हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात (Nagpur winter session) आहेत.
तरच विरोधी पक्षनेत्याला सरकारी विमानाची परवानगी
अजित पवार दुपारी एक वाजता नागपूरहून मुंबईला रवाना होणार आहे. यासाठी शिंदे सरकारकडून विमान उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेत्याला अशाप्रकारच्या सोयी उपलब्ध असतात परंतु त्यासाठी त्यांना कारण नमूद करावं लागतं. त्या कारणाची पडताळणी केल्यानंतरच विमानाची परवानगी देण्यात येते. आजच्या दिवसातील आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे अनिल देशमुख आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्यामुळे अजित पवार त्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे.
अजित पवार तातडीने मुंबईत येण्याचं कारण काय?
दरम्यान अजित पवार तातडीने मुंबईत येण्याच मुख्य कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु केवळ तातडीचं कामाची माहिती शिंदे सरकारला देण्यात आली. त्यानुसार सरकारकडून अजिक पवार यांना विमान उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
अनिल देशमुख यांची आज तुरुंगातून सुटका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका होणार आहे. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची (CBI) मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, देशमुख बाहेर आल्यानंतर आर्थर रोड जेल (Arthur Road Jail) ते सिद्धिविनायक मंदिर ( Siddhivinayak Temple) दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
विधानसभेत अजित पवार यांची फटकेबाजी
दरम्यान विधानसभेत मंगळवारी (27 डिसेंबर) नियम 293 अन्वये सुरु केलेल्या चर्चेत बोलताना अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. अजित पवार यांनी टोले लगावत, कोपरखळी मारत, चिमटे घेत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला आणि सभागृहात हास्याचे कारंजे उडाले.
बारामतीत घड्याळ बंद करण्याचा 'करेक्ट' कार्यक्रम करु असं एका नेत्याने म्हटलं होतं. आता मी मनावर घेतलं ना तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेन. जरा सबुरीने घ्या म्हणावं. खूपच स्पीडने चालले ते, असा टोला अजित पवार यांनी नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. तर गिरीश महाजनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भाजप वाढवण्यास पाठवायचे आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट सगळीकडे आहेत, असं पवारांनी म्हटलं आणि एकच हशा पिकला.
देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले की, "मी आता येऊन वहिनींनाच सांगणार आहे की जरा बघाहो यांच्याकडे, त्यांनी मनावर घेतले की हे एका महिलेला मंत्री करतील. राज्यात अजून एका महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही, हा महिलांचा अपमान आहे." "मंत्रिमंडळात वर्णी लागेल म्हणून अनेकांनी सूट शिवले. त्यांच्या घरचे आता विचारतात की हा सूट कधी घालणार आहे म्हणून. अनेकांचे सूट वाया चालले आहेत," असा टोला अजित पवारांनी भरत गोगावले यांना लगावला.