मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला, त्यानंतर आता बसवराज पाटील यांनीही काँग्रेस पक्ष सोडला, त्यामुळे मराठवाड्यात पक्षाला आणखी एक खिंडार पडलं आहे. काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेले माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील (Basavraj Patil) यांनी आपल्या काँग्रेस (Congress) सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बसवराज पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे लातूरमध्ये काँग्रेस पक्ष खिळखिळा होणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, आज (27 फेब्रुवारी 2024) संध्याकाळी 4.00 वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेशाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. 


चाकूरकरांचे मानसपुत्र भाजपात जाणार - 


काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मंत्री बसवराज माधवराव पाटील (मुरुमकर) यांची भाजपा प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र समजले जाणारे बसवराज पाटील हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून नावाजलेले होते. तेच आता भाजपा प्रवेश करत असल्यामुळे काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आला आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील चाकूरकर समर्थक काँग्रेस कार्यकर्ते या निर्णयाचे स्वागत कसे करतील, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील चाकूरकर समर्थकात अग्रभागी असलेले बसवराज पाटील मुरूमकर यांचं राजकारण चाकूरकरांपासूनच सुरू झालं होतं. शिवराज पाटील चाकूरकर यांनी नेहमीच आपलं वजन बसवराज पाटील मुरूमकर यांच्या पारड्यात टाकलं होतं. याच कारणामुळे काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत बसवराज पाटील मुरूमकर यांची ओळख होत. अशोक चव्हाण पाठोपाठ तेही भाजपामध्ये पक्षप्रवेश करत असल्यामुळे लातूरच्या राजकारणातील देशमुख आणि चाकूरकर या दोन गटातलं आजपर्यंतच्या पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाच्या ऐवजी थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे.


बसवराज पाटील यांची राजकीय कारकीर्द...
मुरूम (ता. उमरगा) येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. 1992 मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी मिळाले होते. 1995 मध्ये त्यांनी उमरगा विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. 1999 च्या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर पक्षाने त्यांना ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्रिपद दिले. 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. 2009 च्या निवडणुकीपासून उमरगा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे पाटलांनी शेजारच्या औसा (जि. लातूर) मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली.औसा विधानसभा मतदार संघातून बसवराज पाटील मुरूमकर यांना उमेदवारी देण्यासाठी शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपलं पक्षातील वजन वापरलं होतं. 2019 आणि 2014 च्या निवडणुकीतही ते औसा मतदार संघातून विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला होता.


चाकूरकर देशमुख संघर्षात कायमच अग्रेसर -


शिवराज पाटील चाकूरकर समर्थक आणि विलासराव देशमुख समर्थक यांच्यामध्ये कायमच सुप्त संघर्ष राहिला होता. या संघर्षामध्ये चाकूरकर गटाकडून बसवराज पाटील मुरूमकर यांनी काही वेळेला विलासराव देशमुख यांना शह दिला होता. 2009-10 मध्ये लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील यांच्या मदतीने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना धक्का दिला. माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर गटातील पंडित धुमाळ हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तर चाकुरकर गटाचे संभाजीराव पाटिल उपाध्यक्ष झाले. त्यावेळी पाटील यांचा देशामुखांसोबतचा संघर्ष उघडपणे समोर आला होता. 2019 च्या निवडणुकीत अमित देशमुख दिलीपराव देशमुख यांनी भाजपाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या बाजूने झुकते माफ दिल्याने बसवराज पाटील मुरूमकर यांची हॅट्रिकची संधी हुकली होती. भाजपाच्या उमेदवाराला काँग्रेसचे नेतेच मदत करत असतील तर आपणच भाजपात का जाऊ नये असं कार्यकर्त्यातून चर्चा सातत्याने वाढत गेली होती.


कमजोर झालेला चाकूरकर गट... 
काँग्रेस पक्षाची राज्यात आणि देशात निर्माण झालेली बिकट परिस्थिती. त्यातच देशमुख गटाकडून सातत्याने होत असलेली पक्षांतर्गत कुरघोडी. आणि भविष्यकाळातील राजकीय वाटचाल लक्षात घेत बसवराज पाटील मुरूमकर यांनी भाजपा प्रवेश करण्याचं निश्चित केल्याचं दिसून येत आहे. आज मुंबई येथे भाजप कार्यालयात बसवराज पाटील मुरूमकर आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करतील हे जवळपास निश्चित झालं आहे. मराठवाड्यात काँग्रेस मजबूत करणारे तीन गट होते. देशमुख गट, चाकूरकर गट आणि चव्हाण गट.. यापैकी चाकूरकर गट बसवराज पाटलाच्या रूपाने भाजपात प्रवेश करतोय तर अशोक चव्हाण यांनी भाजपात यापूर्वीच प्रवेश केला आहे. आता मराठवाड्यात फक्त काँग्रेसमध्ये देशमुख गटाचे प्राबल्य राहिले आहे.