Vijay Wadettiwar On Eknath Shinde: महायुतीच्या सरकारने मुंबईतील टोलबाबत काल महत्वाचा निर्णय घेतला. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी निशाणा साधला आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचदरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरातकडे अस्मिता गहाण ठेवून बदला घेण्याची संधी आता आली आहे. पुतळ्यात कमिशन खाणाऱ्या लोकांचा बदला जनता घेईल. शेतकरी अडचणीत आला. कमिशनखोरी केली जातेय, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केलेय- विजय वडेट्टीवार
मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी यांनी तात्काळ बदल्या करुन घेतल्या आहेत. याआधी असं कधीच झालं नव्हतं. मुख्यमंत्री हे निवडणूक काळात ही हंगामी मुख्यमंत्री असतात. नवीन सरकार येईपर्यंत ते स्टाफ बदलत नाही. जर अधिकारी यांनी बदली करुन घेतली असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली असं म्हणता येईल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद-
केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक केव्हा जाहीर होणार आणि आचारसंहिता केव्हा लागणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता होती. याचदरम्यान निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून आजपासून राज्याच आचारसंहिता देखील लागणार आहे.
सध्या राजकीय चित्र काय?
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.