Maharashtra News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं आज दुपारी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. आज महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे त्यापूर्वी  राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावर हायकोर्टात तातडीच्या सुनावणीची शक्यता आहे. 7 विधानपरिषद आमदारांच्या शपथविधीविरोधात शिवसेना ठाकरे गट पुन्हा हायकोर्टात गेला असून याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. 


राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी हायकोर्टाचा अंतिम निर्णय राखीव असताना आमदारांची नियुक्ती करणं असंविधानिक असल्याचा याचिकाकर्त्या ठाकरे गटाचा आरोप आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सकाळी 10:30 वाजता मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे शपथविधीच्या स्थगितीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. मात्र निकाल राखून ठेवताना हायकोर्टानं राज्य सरकारला याबाबत कुठलेही निर्देश दिलेले नसल्यानं नियुक्त्या कायदेशीर असल्याचा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आला आहे. 


नेमकं प्रकरण काय?            


कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात दाखल केलेली याचिका आणि इतर काही अन्य याचिकांवर गेल्याच आठवड्यात सुनावणी पार पडली. त्यावेळी या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण करुन हायकोर्टानं निर्णय राखून ठेवला आहे. अद्याप हा निकाल आलेला नाही, तसेच तो कधी येईल याचीदेखील शाश्वती नाही. याबाबत स्पष्ट करताना निर्णय राखून ठेवताना हायकोर्टानं याप्रकरणी कोणतेही निर्देश सरकारला दिलेले नव्हते, त्यामुळे नियुक्त्या कायदेशीर असून त्या करण्याचा सरकारचा मार्ग मोकळा असल्याचा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आला आहे.                                         


'या' 7 आमदारांचा शपथविधी                         


भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने संधी दिली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येत आहे.  राष्ट्रवादीकडून  पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. आज हे सातही आमदार शपथ घेणार आहेत.