मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. यापूर्वी आता महाविकास आघाडीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मविआच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. ही बोलणी आता शेवटच्या टप्प्यात असून मविआच्या संभाव्य जागावाटपाचे (MVA seat Sharing Formula) सूत्र समोर आले आहेत. त्यानुसार मविआने 119-86-75 अशा पद्धतीने जागावाटप करायचे ठरवल्याची माहिती काँग्रेसच्या उच्चपदस्थ वर्तुळातून समोर आली आहे.


या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीला काँग्रेस (Congress) 119, शिवसेना ठाकरे गट 86 आणि शरद पवार गट 75 जागा लढवेल, असे सांगितले जात आहे. तर शेकापला 3, समाजवादी पक्ष 3 आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वाट्याला 2 जागा येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष 13 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. अद्याप 10 ते 15 विधानसभा मतदारसंघांचा तिढा कायम असल्याचे सांगितले जाते. मात्र, शरद पवार गट 10 पैकी 8 जागा जिंकत स्ट्राईक रेटच्या गणितात सरस ठरला होता. तरीही शरद पवार गटाने (Sharad Pawar Camp) विधानसभेच्या जागावाटपात सर्वात कमी म्हणजे 75 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. शरद पवार यांची ही भूमिका राजकीय वर्तुळाला बुचकाळ्यात टाकणारी आहे. यामागे शरद पवार यांची काय राजकीय समीकरणे आहेत, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवायला सुरुवात झाली आहे.


निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद


आज दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीत पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे (Jharkhand vidhan sabha Election) वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे सांगितले जात आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये किती टप्प्यात निवडणुका होणार,याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात दिवाळीनंतर (Diwali 2024) म्हणजे 15 नोव्हेंबरच्या आसपास विधानसभेचे मतदान आणि 20 नोव्हेंबरला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.


नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा (Haryana Election 2024) निवडणुकीत भाजपने विजय प्राप्त करत तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या आघाडीला विजय मिळाला होता.


आणखी वाचा


विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त आज जाहीर होणार; राज्यात कोणाचं किती संख्याबळ? A टू Z माहिती एका क्लिकवर


विधानसभा निवडणुकीचं बिगुल थोड्यावेळात वाजणार, जाणून घ्या महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण?