Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या आमदारांसोबत सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप घडताना पाहायला मिळत आहेत. अजित पवारांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीचे भवितव्य काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) भूमिकेनंतर विधिमंडळातसुद्धा अनेक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


महाविकास आघाडी राहणार की जाणार?


राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या आमदारांसह सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) गटाला पाठिंबा दिल्यानंतर जसा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला, तसाच महाविकास आघाडीलाही (MVA) धक्का बसला आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर आता महाविकास आघाडी राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही घटकपक्षांनी आपल्या पक्षांतर्गत बैठका घ्यायला सुरुवात केली आहे.


विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस करणार दावा? 


महाविकास आघाडीला काही धोका नाही, असा दावा जरी नेते करत असले तरी आतमध्ये मात्र मोठी धुसफुस पाहायला मिळते. अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर आता शरद पवारांच्या गटातील आमदारांची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर आता काँग्रेसने दावा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावरून अंतर्गत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्याचे सदस्य जास्त, त्यांचा विरोधी पक्षनेता असतो, असं खुद्द अजित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.


काँग्रेसने बोलावली महत्त्वाची बैठक


अजित पवारांच्या भूमिकेनंतर तात्काळ काँग्रेसनेही हालचाली सुरू केलेल्या आहेत. विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा सांगायला सुरुवात केली एवढंच नाही, तर उद्या मुंबईमध्ये प्रभारी एचके पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक सुद्धा पार पडणार आहे. विरोधी पक्षनेता कोण? हे या बैठकीमध्ये बहुमताने ठरवलं जाणार आहे.


कोण कोण विरोधी पक्षनेते पदाच्या स्पर्धेत?


विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस पक्षाने आजपासूनच काँग्रेस नेत्यांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांसारख्या अनेक नेत्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.


महाविकास आघाडीत पडणार वादाची ठिणगी?


महाविकास आघाडीमध्ये मोठा पक्ष कोण? असा वाद वारंवार पाहायला मिळत होता. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता काँग्रेसकडे सर्वाधिक आमदारांची संख्या आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावरुन ते जागा वाटपावर काँग्रेस दावा करणार आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


हेही वाचा:


Maharashtra Politics: कशी राजकारणाने थट्टा आज मांडली... अजित पवारांनंतर नेटकऱ्यांचाही मजेदार शपथविधी